Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या ते मंत्री संजय राठोडांचा राजीनामा; आतापर्यंतच्या घडामोडी वाचा एकाच क्लिकवर By प्रविण मरगळे | Published: February 16, 2021 12:20 PM 2021-02-16T12:20:20+5:30 2021-02-16T12:25:06+5:30
Pooja Chavan Suicide Case, Minister Sanjay Rathod Resignation: परळीच्या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, मात्र या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली. पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात शिवसेना(Shivsena) मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये राजीनामा देणारे संजय राठोड पहिलेच मंत्री आहे, नेमकं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि संजय राठोड यांचा संबंध काय आहे? आतापर्यंत या प्रकरणात काय घडामोडी घडल्या त्याबद्दल तुम्हाला सांगत आहोत..
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. ७ फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास तिने आत्महत्या केली.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, यात प्रामुख्याने एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तरूणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाच्या महिला आघाडीने केला, मग हा मंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली, भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी याचे संकेत दिले, परंतु चित्रा वाघ यांनी थेट मंत्र्याचे नाव घेतल्याने संजय राठोड यांची अडचण झाली.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात पोलीस महासंचालकांना पत्र लिहून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. पूजा चव्हाण आत्महत्येमुळे बंजारा समाजात अस्वस्थता आहे असं फडणवीसांनी पत्रात म्हटलं होतं.
पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर आलं, अरूण आणि कथित मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत होत्या, हे संजय राठोड संबंधित आहेत असं भाजपाचं म्हणणं होतं, ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडचा(Arun Rathod) आवाज नाही असा दावा त्याच्या गावकऱ्यांनी केला आहे.
त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा दिला होता.
त्यानंतर सोशल मीडियात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजू लागले, तेव्हा पूजाच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी केली, तसेच प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असं लहू चव्हाण ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले होते.
पूजा चव्हाण आत्महत्येला राजकीय रंग चढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य करत पोलीस चौकशीचे आदेश दिले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोषी असेल त्यांना सोडणार नाही, परंतु कोणावरही अन्याय होणार नाही अशी सावध भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.
यानंतरही भाजपा या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली, या संपूर्ण प्रकरणामध्ये संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाचे नेत्यांनी करत संजय राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली. त्यावर संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली
संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपा नेते इतका ठामपणे कसा करत आहेत याबद्दल जाणून घेतले असता, त्यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याची कबूली खुद्द अरुण राठोडनेच दिली आहे. इतकंच नाही तर आपण या प्रकरणात अडकू नये यासाठी या ऑडिओ क्लिप्स देखील त्यानेच भाजपा नेत्यांना दिल्या असं त्यांनी सांगितले.
एकूणच हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्याचं पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आहे, या राजीनाम्यातून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाही इशारा दिला आहे, कारण यापूर्वी राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते, मंत्र्याच्या बंगल्यात तरूणाला मारहाण आणि महिला बलात्काराचा आरोप राष्ट्रवादी मंत्र्यावर झाला होता, त्यामुळे संजय राठोड या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा घेऊन राष्ट्रवादीला योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.