क्रिकेटसाठी चंदू बोर्डेंचं मोठं योगदान, पवारांनी सांगितला 35 हजार रुपयांच्या पेन्शनचा किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:13 AM 2021-09-22T10:13:18+5:30 2021-09-22T10:50:35+5:30
मला क्रिकेट पाहण्याची आवड होती. आयुष्यात पहिल्यांदा पुण्यात मी क्रिकेटचा सामना पाहिला. दुसरी मॅच मात्र गमतीची होती. त्यावेळी 'मुंबई' विरुद्ध 'महाराष्ट्र' ही मॅच सातारा इथे झाली होती. त्यात महाराष्ट्र संघाच्या कप्तानपदी चंदू बोर्डे होते. तर मुंबईच्या कप्तानपदी बापू नाडकर्णी होते. महान क्रिकेटपटू पद्मभूषण चंद्रकांत (चंदू) बोर्डे यांच्या गौरव सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यानी क्रिकेटच्या आठवणी जागवल्या. आज एजिअस फेडरल लाइफ इन्शुरन्स संस्थेच्या वतीने चंदू बोर्डे यांचा पुणे येथे सन्मान आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चंदू बोर्डे यांचा सत्कार माझ्या हस्ते संपन्न झाला, याचा अत्यंत आनंद आहे, असे पवारांनी म्हटले.
चंदू बोर्डे हे १९५८ ते १९७० पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू होते. त्यानंतरही त्यांनी संघाचे प्रशिक्षक व मॅनेजर म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करण्याचा मान मला लाभला असून क्रिकेटबद्दल आस्था असलेल्या महत्त्वाच्या लोकांसोबत हा सोहळा संपन्न झाला आहे.
मी स्वतः कधी क्रिकेट खेळलो नाही. पण माझ्या मते खेळामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक प्रत्यक्ष मैदान गाजवणारे उत्तम खेळाडू आणि दुसरे खेळ वाढविण्यासाठी उत्तम प्रशासक असावे लागतात. मी खेळाच्या क्षेत्रात म्हणून प्रशासक म्हणून काम केले.
मी एमसीएचा दहा वर्ष प्रमुख होतो, बीसीसीआय अध्यक्ष, एशियन क्रिकेटचा अध्यक्ष, वर्ल्ड क्रिकेट उपाध्यक्ष आणि आयसीसी बोर्डाचा अध्यक्ष म्हणून मी काम केले. एक गोष्ट मी कायम मनात ठेवली की, या सगळ्या कालावधीत निवड समितीच्या निर्णयांमध्ये आपले यत्किंचतही योगदान असता कामा नये.
त्याच्यापासून आपण दूर राहिले पाहीजे, ही भूमिका मी घेतली. मी कधी कुणाचेही नाव सुचविले नाही. फक्त कधी संघाचे मॅनेजर वा निवड समिती नेमण्याचा प्रसंग आला तर जाणकारांचे मत घेऊन त्यात सहभागी झालो. यामध्ये चंदू बोर्डेंना संघाचे मॅनेजर म्हणून पाठविण्याच्या निर्णयात कुठेतरी माझा सहभाग होता.
मला क्रिकेट पाहण्याची आवड होती. आयुष्यात पहिल्यांदा पुण्यात मी क्रिकेटचा सामना पाहिला. दुसरी मॅच मात्र गमतीची होती. त्यावेळी 'मुंबई' विरुद्ध 'महाराष्ट्र' ही मॅच सातारा इथे झाली होती. त्यात महाराष्ट्र संघाच्या कप्तानपदी चंदू बोर्डे होते. तर मुंबईच्या कप्तानपदी बापू नाडकर्णी होते
मुंबई संघात जवळपास १० कसोटी खेळणारे खेळाडू होते. संघात १३व्या क्रमांकावर अजित वाडेकर होते. या मजबूत संघाच्या विरोधात महाराष्ट्र संघाने कडवी झुंज दिली होती. त्याकाळात क्रिकेटला महत्त्वाचे स्थान देण्याचे काम ज्या खेळाडूंनी केले, त्यात चंदू बोर्डे यांचे नाव कायम लक्षात ठेवावे लागेल.
एक दिवशी मी कोल्हापूरला असताना भाऊसाहेब निंबाळकर मला भेटायला आले होते. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना आर्थिक चणचण असल्याची बाब माझ्या लक्षात आली. त्यामुळेच आयपीएल सुरु झाल्यानंतर त्यातून येणाऱ्या पैशांचा सदुपयोग करण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतला.
जुन्या खेळांडूना पैसे मिळतील अशी तरतूद केली. त्यानंतर काही महिन्यांमध्ये पुन्हा कोल्हापूरला गेलो असता भाऊसाहेबांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांना ३५ हजारांची पेन्शन मिळते. क्रिकेट बोर्डाने माझ्यासाठी खूप काही केले, अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली.
मुंबई ही क्रिकेटची पंढरी होती. क्रिकेटसाठी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम माझ्याकडे होते. त्यावेळी देशातील कोणेतही राज्य, कोणतीही असोसिएशन सुसज्ज स्टेडियम बांधत असेल तर त्याला बोर्डाकडून ५० कोटी अनुदान देण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला आणि तो राबवला.
त्या निर्णयाने देशात अनेक ठिकाणी सोयी-सुविधा निर्माण झाल्या. त्यातून नवीन खेळाडू तयार झाल्याचे दिसते. हे सगळे घडले ते क्रिकेटच्या इतिहासात चंदू बोर्डे यांच्यासारखे योगदान देणाऱ्या व्यक्ती झाल्या आहेत म्हणून.. हा आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे.
त्यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूचा आज गौरव होतोय याचा मला आनंद आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने यात पुढाकार घेतला, याचेही समाधान वाटते. चंदू बोर्डे यांचे अभिनंदन करतो व त्यांनी उर्वरित आयुष्य असेच उत्तमरित्या जगावे आणि क्रिकेट विश्वाला चांगले खेळाडू देत राहावे,या शुभेच्छा देतो, असे पवार यांनी म्हटले.