ऑनलाइन लोकमतसांगली/सोलापूर, दि.5 - शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (5 जून) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकरी बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी संपाचे राज्यभरातील परिणामसोलापूर - सांगोला शहर तालुक्यात शेतक-यांनी कडकडीत बंद पाळला आहे. दूध संकलन, भाजीपाला, फळे विक्रीस न आल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच बाजार समितीतील भाजीपाल्याची आवकही मंदावली आहे. यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. दूध पंढरी दूध संकलनानं शेतक-यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तर पहाटेच्या सुमारास मानेगाव येथे शेतक-यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळ्यासह अनेक ठिकाणी शेतक-यांचे रास्तारोको आंदोलन सुरू आहे. (शेतकरी संपाचा पाचवा दिवस, आज "महाराष्ट्र बंद") सांगली - शेतक-यांच्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला जात आहे. सार्वेड येथे बंदला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. आंदोलकांनी याठिकाणी वाहनांचे टायर जाळले आहेत. वाळला तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, कडेगाव तालुक्यातील वांगी, आसद, देवराष्ट्रे, जत तालुक्यातील वाळेखिंडी परिसरात कडकडीत बंद आहे. तासगावात गाव बंद ठेवून कर्जमाफीबाबत घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी फेरीदेखील काढली.(शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा) हिंगोली - शेतक-यांच्या राज्यव्यापी बंदमध्ये शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे. यवतमाळ - नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अर्जुना येथे शेतकऱ्याचा रास्ता रोको सुरू आहे. शेतकरी वारकरी संघटनेने या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे यवतमाळ - आर्णी मार्गावरील वाहतूक सकाळी 9 वाजताल्यापासून ठप्प आहे. पुणे - शेतक-यांच्या बंदमुळे पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची केवळ 30 ते 40 टक्के आवक झाली आहे. मात्र खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुले रविवारच्या तुलनेत भाव निम्म्या किमतीनं खाली आले आहेत. शिरपूर (वाशिम) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला. तर काही गांधीगिरी स्टाईलनं जनावरांना भाजीपाला खाऊ घातले. तसंच शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपला रोषदेखील व्यक्त केला. नंदुरबार- शेतकरी संपाला पाठींबा देण्यासाठी रनाळे येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. आंदोलकांनी दोंडाईचा रस्त्यावरील वाहतूक तब्बल एक तास रोखली होती. दरम्यान पोलिसांना निवेदन दिल्यानंतर येथील आंदोलन मागे घेण्यात आले. नांदेडमधील अर्धापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तर महादेव पिंपळगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलं. अहमदनगर - पारनेर तालुक्यातील निघोज येथे शेतक-यांनी गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं. दूध रस्त्यावर न ओतता त्यांनी दुधाचे गोरगरिबांमध्ये वाटप केले. तर दहिगाव बोलका येथील नागपूर-मुंबई हायवेवर शेतमालाची वाहनं अडवून मिरच्यांची पोती रस्त्यावर ओतण्यात आली. तर वडझिरे गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.