टीम इंडियाच्या 'या' दिग्गज खेळाडूनं केलं होतं पळून जाऊन लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 02:13 PM2018-09-11T14:13:53+5:302018-09-11T14:16:50+5:30

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि डोना रॉय यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. शेजारी राहणं, एकमेकांना लपून पाहणं, कुटुंबाचा विरोध, पळून जाऊन लग्न, त्यानंतर घरच्यांची नाराजी, अशा अनेक गोष्टींचा सामना सौरव आणि डोनानं केला. मात्र आयुष्यात इतक्या अडचणी येत असूनही दोघांमधलं प्रेम कधीच कमी झालं नाही.

सौरव आणि डोना लहानपणापासून एकमेकांचे मित्र. शेजारी राहात असल्यानं दोघांनी बराच काळ सोबत घालवला. एकमेकांच्या अगदी शेजारी राहात असल्यानं सौरव अनेकदा डोनाला पाहायचा. सुरुवातीला सौरवला ये-जा करताना डोना दिसायची. त्यानंतर सौरव हे सगळं मुद्दामहून करु लागला.

लहानपणापासूनच्या या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. दोघांच्या कुटुंबाचा या नात्याला विरोध होता. मात्र नंतर सौरवचं कुटुंब लग्नासाठी तयार झालं. पण डोनाचा वडिलांचा लग्नाला ठाम विरोध होता. इतकं सर्व असूनही, डोना सौरवचे सर्व सामने पाहायला यायची आणि सौरवदेखील डोनाच्या नृत्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित असायचा.

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डोनाच्या कुटुंबाचा विरोध असल्यानं सौरवनं डोनाला पळवून कोर्टात आणण्याचा प्लान केला होता. मात्र भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीनंतर सौरव प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यामुळे कोर्ट मॅरेजचा प्लान रद्द करण्यात आला आणि दोघांनी मित्राच्या घरी जाऊन विवाह केला.

डोना रॉयची डोना गांगुली होऊन अनेक दिवस उलटूनही या लग्नाची बातमी कोणालाच समजली नाही. बऱ्याच कालावधीनंतर याची माहिती डोनाच्या कुटुंबाला समजली. यानंतर संपूर्ण कुटुंब डोनावर संतापलं. मात्र काही दिवसानंतर सर्वकाही सुरळीत झालं आणि रॉय कुटुंबानं हे नातं स्वीकारलं.