Fashion Tips: लग्नासाठी परफेक्ट नाजूक सुंदर मुंडावळ्या कशा निवडाल? लक्षात ठेवा ८ गोष्टी, बांधा सुंदर मुंडावळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 06:24 PM2022-06-03T18:24:55+5:302022-06-03T18:33:56+5:30

१. पुर्वी लग्नातल्या मुंडावळ्या म्हटलं की त्याचं एकच टिपिकल डिझाईन असायचं. मोत्याच्या दोन माळा आणि त्याला दोन्ही बाजूंनी आणखी दुसऱ्या मोत्याच्या माळा आणि खाली लाल, गुलाबी गोंडा. त्यामुळे मुंडावळ्या खरेदी हा काही फार मोठा विषय नसायचा..

२. आता मात्र त्यात असंख्य प्रकार आले आहेत. अगदी एखादं कानातलं, गळ्यातलं घ्यायला गेल्यावर त्यात जसे अनेक प्रकार असतात आणि त्यातून आपल्याला निवडावे लागतात, त्याचप्रमाणे आता मुंडावळ्यांची खरेदीसुद्धा वेळखाऊ झाली आहे..

३. शिवाय नवरी कोणती साडी नेसणार, तिच्या कपड्यांचा रंग, मेकअप कसा असणार, हेअरस्टाईल कशी या सगळ्या गोष्टीही आजकाल मुंडावळ्या निवडण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि त्यानुसारच मुंडावळ्यांची खरेदी केली जाते. असाच सगळा विचार नवऱ्या मुलाच्या मुंडावळ्या खरेदी करतानाही केला जातो.

४. लग्नात नवरीच्या बहुतेक साड्या या सोनेरी जर असणाऱ्या आणि टिपिकल काठपदराच्या असतात. म्हणूनच या सोनेरी जरीच्या साडीला सोनेरी रंगाच्या मुंडावळ्या अधिक शोभून दिसतात.

५. आजकाल लग्नात नवरी नऊवारी साडी नेसते. या साडीवर चिंचपेटी, तन्मणी, कानात मोत्याच्या कुड्या, असा सगळा मोत्याचा साज केला जातो. म्हणूनच जर नवरी मोत्याचे दागदागिने घालणार असेल तर मोत्याच्या मुुंडावळ्या तिच्या या वेशभुषेवर अधिक शोभून दिसतात.

६. मुंडावळ्या, गळ्यातलं आणि कानातलं या तिघांचं मॅचिंग करण्याचा हल्ली बराच प्रयत्न केला जातो. जर तुमच्या गळ्यातल्याला किंवा कानातल्याला अशा साखळ्या असतील तर त्याला मॅचिंग होणाऱ्या अशा पद्धतीच्या मुंडावळ्या घेऊ शकता.

७. त्याचप्रमाणे जर कानातल्यांना मोत्यांची लटकन असतील, तर त्याला मॅचिंग होणाऱ्या अशा लटकन असणाऱ्या मुंडावळ्या नवरीचा लूक अधिक आकर्षक करतील. पण अशा मुंडावळ्या घेणार असाल तर टिकलीची साईज मात्र थोडी लहान ठेवा.

८. मोठी ठसठशीत चंद्रकोर लावणार असाल किंवा इतर कोणतीही मोठ्या आकाराची टिकली लावणार असाल तर अशा नाजूक मुंडावळ्या अधिक छान दिसतील. टिकली आणि मुंडावळ्या यांचा आकार एकमेकांशी मिळता जुळता असणं अधिक गरजेचं आहे.

९. मुंडावळ्या आणि बाशिंग असं दोन्हीही लावणार असाल, तर असं नाजूक साजूक डिझाईन पसंत करा. यामुळे परंपरेनुसार दोन्ही गोष्टी लावल्याचं समाधान मिळेल आणि शिवाय दिसायलाही आकर्षक वाटेल.

१०. वरमाला आणि मुंडावळ्या अशा पद्धतीने एकमेकांना मॅचिंग असल्या तर अधिकच उत्तम. पण यासाठी तुमच्या साडीचा रंग आणि इतर दागिने यांचाही विचार करा आणि त्यानुसार मुंडावळ्यांची निवड करा.