शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mithali Raj Announces Retirement : भारतीय किक्रेटवर 'राज' करणाऱ्या मितालीची निवृत्ती; काय आहे तिच्या करिअरचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 5:15 PM

1 / 13
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना महिला क्रिकेटच्या प्रेमात पाडणाऱ्या, महिला क्रिकेटपटूंच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाला वेगळी उंची गाठून देणाऱ्या मिताली राजने (Mithali Raj) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (Mithali Raj announces retirement)
2 / 13
1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी भारताकडून खेळण्यास सुरुवात करणारी मिताली या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे. तिने 12 कसोटी, 232 एक दिवसीय आणि 89 T20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि टीम इंडियाला दोन विश्वचषक फायनलपर्यंत नेणारी कर्णधार देखील होती. वनडेमध्ये ती जगातील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने सात शतके आणि 64 अर्धशतकांसह 7805 धावा पूर्ण केल्या.
3 / 13
३९ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मितालीने लिहिले की, मी अगदी लहान मुलगी होते तेव्हा मी निळी जर्सी परिधान करून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. हा प्रवास खूप मोठा होता. या काळात विविध प्रकारचे क्षण मला अनुभवायला, पाहायला मिळाले. गेली २३ वर्षे माझ्या जीवनातील सर्वात उत्तम क्षणांपैका होती. प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही आता थांबत आहे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.
4 / 13
वीस वर्षांत मिताली राजने क्रिकेटमधील सर्व घडामोडी बघितल्या, मोठे बदल बघितले. जुने टीममेटस् बदललेत, नवे आले. वयानुसार, सिनिॲरिटीनुसार तिला तिची मानसिकता, रोल बदलावे लागलेत; पण ती तरीही खेळत राहीली. क्रिकेटमध्ये म्हणतात ‘इट्स टू हॉट इन टू द किचन’ म्हणजे तुम्ही ताण हाताळू शकत नसाल तर लवकरच स्वत:हून बाहेर पडता; पण मिताली राज गेल्या २० वर्षांपासून प्रेशर, चॅलेंज सगळं सांभाळून क्रिकेट खेळली
5 / 13
१२ मार्च २०२१ चा तो दिवस. मितालीने २६ जून १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. काळाचा केवढा मोठा टप्पा. २२ वर्षांचा प्रदीर्घ काळ. या काळाच्या कसोटीवर उतरणं हेच खरंतर तिच्या यशाचं मोठं वैशिष्ट्य आहे. आठवा १९९९चा हा काळ. पाकिस्तान संघ प्रदीर्घ काळानंतर भारत दौऱ्यावर होता.
6 / 13
सचिन तेंडुलकरची पाठदुखी राष्ट्रीय चिंतेचा विषय बनलेली होती आणि चेन्नईत पाकिस्तान संघानं भारतीय संघाला मैदान दाखवलं, तिकडे दिल्लीत अनिल कुंबळेनं पाकिस्तानचा सारा संघ बाद करत नवा विक्रम केला. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी स्वत: शांततेचा पैगाम घेऊन लाहोरला गेले.
7 / 13
जुनी वैराची भूतं गाडून नव्या मानवी जगाची पायाभरणी होऊ शकेल अशी किमान आशा तरी १९९९ ने सुरुवातीच्या तीन महिन्यांत दाखवली. मात्र मे महिना उजाडता उजाडता सारंच पालटलं आणि कारगील युद्ध सुरू झालं. स्वप्न, उमेद आणि वास्तव यांची भयाण परीक्षा पाहणारा. त्याकाळात तिनं भारतीय संघात पदार्पण केलं आणि ती खेळतच राहिली.
8 / 13
तो काळ असा होता की, बायका आणि क्रिकेट हा टिंगलीचा विषय होता. बायका क्रिकेटपटूंच्या फॅन असू शकतात, पण त्यांना क्रिकेट कळत नाही असं म्हणून महिला प्रेक्षकांची हेटाळणी आम बात होती. बायकांचं क्रिकेट नव्हे बायकांची भातूकली म्हणून त्याची राजरोस टिंगलही होत असे. खासगी वाहिन्यांवर लाइव्ह दिसू लागलेल्या क्रिकेटला बाजारपेठ म्हणून महिला प्रेक्षक तर हव्या होत्या, पण त्यांना क्रिकेट कळत नाही हा समज ठाम.
9 / 13
त्याच काळात मिताली राज नावाची एका जेमतेम मध्यमवर्गीय घरातली मुलगी हातात बॅट घेऊन म्हणत होती की मी क्रिकेट खेळणार! तिच्यापेक्षाही तिचे वडील, ज्यांनी मुलीच्या हाती बॅट दिली. अर्थात सोपं नव्हतंच क्रिकेटपटू होणं. मात्र तमिळ कुटुंबातली राजस्थानात वाढलेल्या या मुलीनं वडिलांच्या पाठिंब्याने वेगळी वाट चालायला सुरुवात केली. तिचे वडील दोराई राज भारतीय वायूदलात एअरमन म्हणून काम करत. भावासोबत मितालीनं क्रिकेट खेळणं सुरु केलं.
10 / 13
या मुलीला पुस्तकं हाका मारत, भरतनाट्यम तर तिचा जीव की प्राण होतं. पण वडिलांना वाटलं की आपल्या मुलीनं क्रिकेट खेळलं पाहिजे. कशाच्या जोरावर या गृहस्थांनी मुलीच्या हातची क्रिकेटची बॅट सुटू दिली नाही हे कोडंच असावं, पण मितालीला मात्र क्रिकेट खेळावंच लागलं. तिचा ‘आळशीपणा’ वडिलांना मान्य नव्हता. त्यांनी भरतनाट्यम सोडवलं पण क्रिकेट सुटू दिलं नाही.
11 / 13
मितालीनं आजवर अनेक मुलाखतीत हे सांगितलं आहे की, आयुष्यात प्लॅन बी असं काही असतं हेच मला माहिती नव्हतं. त्यांनी मला घोड्यासारखं ट्रेन्ड केलं, डाव्या उजव्या बाजूला पाहायचंच नाही, क्रिकेट एके क्रिकेट हेच माझं शिक्षण आणि हेच माझं लहानपण होतं. अर्थात वडिलांना काहीही वाटत असलं तरी भारतीय कुटुंबात मुलगी क्रिकेटमध्ये, किंवा खेळात करिअर करणार हे पटणंच कुणालाही शक्य नव्हतं.
12 / 13
आजीआजोबा, मावशाकाकवा, नातेवाइक सगळे एकच गोष्ट म्हणत, कुठं पोरीला खेळायला पाठवता, ती काळी पडेल. हातपाय मोडला तर पुढे लग्न कसं होणार? पण माझे वडील ठाम होते. त्यांचा लेकीपेक्षाही तिच्या हातातल्या बॅटवर जास्त भरवसा असावा!’
13 / 13
भारतीय क्रिकेटसाठी सचिन तेंडुलकरनं जे बदलाचं वारं आणलं, हजारो मुलांना क्रिकेट खेळण्याचं वेड लावलं तेच मितालीनं महिला क्रिकेटसाठी केलं!
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMitali Rajमिताली राज