मार्क कमी पडल्याने बारा वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 08:14 PM2019-07-22T20:14:31+5:302019-07-22T20:14:53+5:30
विद्यार्थिनी त्रिवेणीनगर येथील एका खासगी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते.
पिंपरी : मार्क कमी पडल्याने एका बारा वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी त्रिवणीनगर येथील खासगी शाळेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थिनी त्रिवेणीनगर येथील एका खासगी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते. सोमवारी शाळेचा ‘ओपन डे’ होता. या दिवशी विद्यार्थी आणि पालक दोघेही शाळेत येतात. पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी सांगितले जाते. तिला मागील परीक्षेत कमी मार्क मिळाले याची माहिती शिक्षकांनी सर्वांसमोर तिच्या पालाकांना दिली. कमी असलेले मार्क सर्वांसमोर सांगितल्याने ती उदास झाली.
‘ओपन डे’ कार्यक्रम दुपारी अडीचच्या सुमारास झाला. त्यानंतर तिची आई शाळेच्या इमारतीच्या खाली थांबली होती. त्या वेळी तिने शाळेच्या तिसºया मजल्यावरून उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.