पिंपरी : वातावरणातील सततच्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा आजार बळावला आहे. स्वाइन फ्लूमुळे सप्टेंबर महिन्यात १७ बळी गेले आहेत. मंगळवारी स्वाइन फ्लूने जीवननगर, ताथवडे येथील एका ४३ वर्षीय इसमाचा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित इसमाला १७ सप्टेंबरला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली. त्यांना १९ तारखेला चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांना टॅमी फ्लू सुरू करण्यात आल्या. त्यांची लाळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली. २२ तारखेला आलेल्या अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. २९ तारखेला सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना असफल ठरत आहेत. १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत या आजारामुळे बळी पडलेल्यांची संख्या आता ५५ झाली आहे. ९४७ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांपैकी ५०३ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांपैकी ६ रुग्ण अत्यवस्थ आहेत. या रोगाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचे महिन्यात १७ बळी
By admin | Published: October 01, 2015 12:51 AM