तळेगाव-शिक्रापूर मार्गासाठी १८०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:16 AM2017-12-07T06:16:49+5:302017-12-07T06:16:53+5:30
तळेगाव -चाकण- शिक्रापूर-नाव्हरा- चौफुला चौक या रस्त्याकरिता १८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली.
तळेगाव दाभाडे : तळेगाव -चाकण- शिक्रापूर-नाव्हरा- चौफुला चौक या रस्त्याकरिता १८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी तळेगाव-चाकण रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
औद्योगिक क्षेत्राकडे होणाºया मालवाहतुकीमुळे तळेगाव ते शिक्रापूर असा ५६ किमीचा पट्टा अति अपघातप्रवण बनला आहे. याविषयी आमदार बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, कार्यकारी अभियंता वाबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता शीतल देशपांडे, प्रकल्प शाखा अभियंता पी. जी. गाडे आदी उपस्थित होते.
बाह्यवळणचा आराखडा
सदर महामार्ग हा वडगाव फाटा ते इंदोरीपर्यंत ६० मीटर रुंद व ६ किमी लांब व तेथून पुढे चाकणपर्यंत २३ किमी लांब व ६० मीटर रुंद होणार आहे. या रस्त्यात बरीच बांधकामे येत असल्यामुळे रुंदी ४५ मीटर करावी, रस्त्याच्या कामामध्ये माझे बांधकाम अडथळा ठरत असले, तर ते देखील काढून टाकावे. एक महिन्यामध्ये बाह्यवळण मार्गाचा डी.पी.आर. तयार करण्याच्या सूचना बाळा भेगडे यांनी अधिकाºयांना केल्या.