बँक लोन मंजूर झाल्याचे सांगून दोन लाखांची लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 08:45 PM2019-12-30T20:45:46+5:302019-12-30T20:46:29+5:30
फिर्यादींनी गुगल अँपवरून २ लाख ७ हजार १५६ रुपये आरोपींच्या अकाऊंटवर ट्रान्स्फर केले.
पिंपरी : खोटी ओळख सांगून बँकेचे लोन मंजूर झाले आहे, असे सांगत विश्वास संपादित केला. त्यानंतर कर्ज मंजूरीसाठी वारंवार पैशाची मागणी करून एकाकडून सुमारे दोन लाख रुपये लुबाडले. १ ते २० ऑगस्ट २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार महेश्वर सिंग (वय ३८, रा. मयुरेश हॉटेलजवळ, शांतीनगर, भोसरी, मूळ. मिरजानगर, जि. वैशाली, बिहार) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुजितकुमार व्यवसाय करतात. त्यांना तीन मोबाईल नंबर आणि एका ई-मेलवरून आरोपींनी खोटी ओळख सांगितली. त्यानंतर त्यांना कर्ज मंजूर झाल्याचे सांगून सुजितकुमार यांचा विश्वास संपादित केला.
कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी सुजितकुमार यांनी गुगल अँपवरून २ लाख ७ हजार १५६ रुपये आरोपींच्या अकाऊंटवर ट्रान्स्फर केले. मात्र, कर्ज मंजूर न करता आणि पाठविलेले पैसे परत न देता सुजितकुमार यांची फसवणूक केली. त्यामुळे सुजितकुमार यांनी पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम विभागात धाव घेवून फिर्याद दिली.