हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी पुनर्वसनास २८० कोटींचे पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 02:05 PM2019-07-18T14:05:23+5:302019-07-18T14:17:17+5:30
मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एचएला मदत करा, असे साकडे घातले होते...
पिंपरी : औद्योगिकनगरीची पायाभरणी करणाऱ्या पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीस जीवदान देण्यासाठी २८० कोटींचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. तसेच पीपीपी तत्त्वावर कंपनी सुरू ठेवण्याबाबत मॉडेल तयार करण्याचाही निर्णय झाला आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीची पायाभरणी पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीत हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीची (एचए) सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारचा अंगीकृत हा प्रकल्प असून, पेनिसिलीनची निर्मिती या कंपनीत केली जात होती. पुढे १९९६ मध्ये कंपनीस आजारी उद्योग म्हणून घोषित केले होते. त्यानंतर २००६ मध्ये केंद्र सरकारच्या वतीने विशेष आर्थिक मदत म्हणून २६० कोटींची मदत केली होती. त्यानंतर हा प्रकल्प अडचणीत आला. त्यानंतर २०१४ पासून आजपर्यंत सुमारे दीडशे कोटी वेतनासाठी केंद्राने निधी दिला होता.
एचए कंपनीचे पुनर्वसन करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्राला साकडे घातले होते. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर बारणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एचएला मदत करा, असे साकडे घातले होते. कामगार संघटनेनेही नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आर्थिक नियोजनाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, राज्यमंत्री मनसुख मांडविया आदी उपस्थित होते.
बैठकीविषयी माहिती देताना बारणे म्हणाले, एच़ ए़ प्रश्नाबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. त्या वेळी २८० कोटींचे पॅकेज देण्याचे सरकारने कबुल केले आहे. त्यापैकी १५८ कोटी वेतनासाठी तर १७२ कोटी व्हीआरएस योजनेसाठी देण्यात येणार आहे. तसेच हा प्रकल्प सरकार पातळीवर सुरू ठेवणे अवघड असल्याने पीपीपी तत्त्वावर सुरू ठेवावा, असा विचार पुढे आला. तसेच या संदर्भात कोणते धोरण ठरवायचे, पीपीपीचे मॉडेल तयार करावे, याबाबत मंत्र्यांनी सूचना केल्या आहेत.