पिंपरी : खर्चात बचत केल्याचा दावा करणा-या महापालिकेतर्फे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या खर्चात तीन कोटींनी वाढ झाली आहे. ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलास वर्षापूर्वी ९० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. स्थायी समितीत आयत्या वेळी या विषयास मान्यता दिली.महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौक आहे. या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या चौकामुळे लहान-मोठे अपघात नेहमीच होत असतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वाहतुकीची कोंडीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी सुमारे १३५ कोटी रुपये खर्चाला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. त्यानंतर भक्ती-शक्ती चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली. १०३ कोटी रुपये निविदा दर निश्चित केला होता. त्यानुसार चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एका संस्थेने ७२ कोटी रुपये दर सादर केला. ही निविदा सर्वांत कमी दराची असल्याचा दावा केला होता.>असा वाढला खर्चभाजपाचा खर्चाचा दावा फोल ठरला आहे. १४ महिन्यांत खर्चात वाढ झाली आहे. उड्डाणपुलावरील विद्युत कामासाठी महापालिकेने तीन कोटी १४ लाख ७५ हजार ८१२ रुपये खर्चाची निविदा स्वतंत्रपणे मागविली. पाच ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यांपैकी एकाने निविदा १५.०७ टक्के कमी दराची प्राप्त झाली. ही निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार मुदतीमध्ये काम पूर्ण करण्यास सक्षम असल्याने प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी ३१ जुलै रोजी ही निविदा स्वीकारली. त्यानंतर तातडीने याबाबतचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीसमोर आयत्या वेळी आणला. त्यास विनाचर्चा मान्यता देण्यात आली.
सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:31 AM