पिंपरी : गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कामगाराने मालकालाच ३५ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. मालकाने गॅस, तसेच रेग्युलेटर, सुरक्षा पाईप लायटरची विक्री करण्यास तसेच ते पैसे गॅस एजन्सीमध्ये जमा करण्यास सांगितले होते. मात्र, कामगाराने रोख पैसे स्वीकारले तर ऑनलाईन पैसे स्वीकारताना भावाच्या आणि पत्नीच्या गुगल पे, फोनवर स्वीकारून तब्बल ३५ लाखांचा अपहार केला. ही घटना २० फेब्रुवारी २०२१ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ओवी गॅस एजन्सी, रावेत येथे घडली. या प्रकरणी निलेश चंद्रकांत डोके (वय ४५, रा.चिंचवडगाव) यांनी रावेत पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.९) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी श्रवणकुमार मोहनराम मांजू (रा. जांभे, मुळशी, मुळ गाव- मंडला काला, जोधपूर, राजस्थान) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी कामगार आरोपी याला आपल्या भारत ओवी गॅस दुकानातील गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, सुरक्षा पाईप ग्राहकांना विक्री करण्यास सांगितले होते. तसेच यातून येणारी रोख रक्कम दररोज ऑफीसमध्ये जमा करण्यास सांगितले होते. ऑनलाईन पैसे घेताना ओवी गॅस एजन्सीच्या स्कॅनरद्वारे घेणे आवश्यक होते. मात्र, आरोपीने रोख रक्कम स्वत:कडेच ठेवली तर ऑनलाईन पैसे घेताना आपल्या भावाच्या आणि पत्नीच्या गुगुल पे आणि फोनपे द्वारे घेतले. ऑनलाईन पैसे घेताना पत्नी आणि भावाचे अकाऊंट हे गॅस एजन्सीचे असल्याचे त्याने ग्राहकांना भासवले. फिर्यादी यांना प्रथमदर्शी आरोपीने तब्बल ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास येत आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.