थकबाकीदारांच्या ३७ मिळकती जप्त, मिळकतकर वसुली पथकाची कारवाई; नागरिकांनी घेतला धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:23 AM2018-03-08T03:23:14+5:302018-03-08T03:23:14+5:30
शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपये पेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १०९ जणांना नोटिसा दिल्या असून आजपर्यंत ३७ मिळकती जप्त केल्या आहेत. जप्तीची कारवाई सुरू झाल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे.
पिंपरी - शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपये पेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १०९ जणांना नोटिसा दिल्या असून आजपर्यंत ३७ मिळकती जप्त केल्या आहेत. जप्तीची कारवाई सुरू झाल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजल्याने अनधिकृत बांधकामांना शास्ती लावण्यात आली होती. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण मंजूर केले असले तरी जाचक अटीमुळे फक्त नऊ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान मार्च एंडिंगमुळे मिळकतकर विभागाने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पूर्वीच्या नोटिसा बजाविल्यानंतरही सात दिवसांचे आत मिळकतकराची रक्कम भरणा केलेली नाही, अशा मिळकतधारकांवर मिळकत जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुटीचे दिवशी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. मिळकतधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. तसेच मिळकतकराचा आॅनलाइन भरणा करणाºया मिळकतधारकांना सामान्य करात दोन टक्के सवलत आहे. आजअखेर दोन लाख ७८ हजार मिळकतधारकांनी ३८० कोटी ४३ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख १८ मिळकतधारकांनी आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे. पाच हजारांपेक्षा अधिक बिल असणारांची संख्या एक लाख तेरा हजार तीनशे बहात्तर आहे. त्यापैकी व्यावसायिक थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. एकूण ३७ मिळकतींपैकी थेरगावातील १४, आकुर्डीतील सात, तळवडेतील सहा, भोसरीतील तीन, सांगवीतील दोन, मनपा भवन परिसरातील एक अशा मिळकतींना सील ठोकलेआहे. तसेच पुढील आठवड्यात पंचवीस मिळकतींवर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.
पाच हजारांपेक्षा अधिक जणांवर होणार कारवाई?
पिंपरी-चिंचवड कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी २०१८ अखेर ज्या मिळकतधारकांकडे रक्कम रुपये पाच हजार पेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा एक लाख १३ हजार ३७२ मिळकतधारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत. जे मिळकतधारक नोटीस बजावूनही थकबाकी भरणार नाहीत, अशा मोठ्या थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सहआयुक्त गावडे यांनी दिली.