पॅकेजिंग कंपनीत आग लागून ८० लाखांचे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:03 PM2021-12-04T22:03:39+5:302021-12-04T22:06:04+5:30
Fire News : तळवडे येथील इंदोर पॅकेजिंग इंडस्ट्रीज या कंपनीत आग लागली.
पिंपरी : पेपर - पुठ्ठा पॅकेजिंग कंपनीत आग लागून साहित्य खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागून यात ८० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंदोर पॅकेजिंग इंडस्ट्रीज, ज्योतिबा नगर, सोनवणे वस्ती रोड, तळवडे येथे शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील इंदोर पॅकेजिंग इंडस्ट्रीज या कंपनीत आग लागली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांसह पिंपरी -चिंचवड महापालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, तसेच टाटा मोटर्स कंपनी आदी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या ११ बंबांच्या साह्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे उप अग्निशामक अधिकारी उदय वानखेडे, ऋषिकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली ४२ अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पुठ्ठा रोलिंग पेपर याचे असंख्य रोल (कागद गुंडाळी) असल्याने व सदरचे मटेरियल आगीकरीता पोषक असल्याने आग धुमसत होती.
इंदोर पॅकेजिंग इंडस्ट्रीज पेपर/पुठ्ठा पॅकेजिंग कंपनी असून या कंपनीत पेपर रोल बनवण्याचे काम चालते. कंपनीमध्ये आग लागून जळाल्याने पॅकेजिंग मटेरिअल, पुठ्ठा, पेपर रोल, इलेक्ट्रिक वायरिंग, कोरोट्रोन मशिन, कोरोट्रोन कटर मशीन, स्टॅन्ड, पेस्टिंग मशीन, रोटर मशीन, स्टिंचींग मशीन अशा विविध साहित्याचे नुकसान झाले. सुमारे ८० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.