पिंपरी : केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. पोलिसांनी फेसबुकवरून त्याला फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली. ती स्वीकारल्यानंतर त्याला भेटण्यासाठी बोलावले आणि जेरबंद केले. चोरीस गेलेले सोन्याचे २४ तोळ्यांचे दागिने व २० हजारांची रोकड असा एकूण सहा लाख १५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपीला गुरुवारपर्यंत (दि. २२) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संदीप भगवान हांडे (वय २५, सध्या रा. वाल्हेकरवाडी, मूळ रा. पिंपरखेडा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी येथे अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याचे २४ तोळ्यांचे दागिने व ४० हजारांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी संगीता अजित कांकरिया (वय ५२, रा. क्रांती चौक, कीर्तीनगर, नवी सांगवी) यांनी १७ ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सांगवी पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. फिर्यादी यांनी २० सप्टेंबर रोजी दागिने कपाटात ठेवले होते. त्यानंतर २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान केअर टेकर म्हणून आरोपी हांडे फिर्यादी यांच्याकडे काम करत होता. तो मध्येच काम सोडून गेल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्याच्या मोबाइल फोनचे लोकेशन घेतले आणि त्याला फेसबुकवर फ्रेंड रिकवेस्ट पाठवून भेटण्याची वेळ ठरवून कल्पतरू चौक येथे भेटण्यासाठी बोलावले. कल्पतरू चौकात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले 24 तोळे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सहा लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तसेच सदरचा गुन्हा उघडकीस आणला.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बो-हाडे, अरुण नरळे, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.