पिंपरी : घरफोडीच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. भक्तीशक्ती चौक, निगडी येथून त्याला शनिवारी (दि. १६) जेरबंद केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली. अनिल दत्ता कांबळे (वय २८, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख व पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, सुखदेव गावंडे फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी कांबळे भक्ती शक्ती चौक, निगडी येथे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी भक्तीशक्ती चौक येथील जकात नाक्याजवळील पीएपीएमएल बसथांब्याजवळ कांबळे थांबला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देता होता. त्यामुळे त्याला युनिट चार येथे आणून अधिक चौकशी केली. घरफोडी करून २०११ पासून तो फरार असल्याचे समोर आले. हिंजवडी पोलीस ठाण्यात या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.युनिट चारचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक फौजदार वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, पोलीस कर्मचारी संजय गवारे, नारायण जाधव, धनाजी शिंदे, तुषार काळे, सुखदेव गावंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
घरफोडीच्या गुन्हयातील नऊ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 8:45 PM
आरोपी भक्ती शक्ती चौक निगडी येथे येणार असल्याची पोलिसांना मिळाली माहिती
ठळक मुद्देनिगडी गुन्हे शाखेची कामगिरी