पिंपरी - निगडी येथील अप्पूघरला महापौर राहुल जाधव यांनी भेट दिली. खेळणी नादुरुस्त असल्याचे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. पर्यटन विकासाला चालणा देणारा उपक्रम बंद होऊ नये, याची दक्षता घेण्याची गरज आहे़ नादुरुस्त खेळणी दुरुस्ती करावी, अशा सूचना महापौरांनी प्रशासनास दिल्या आहेत.अप्पूघर, निगडी या ठिकाणी महापालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महापौर यांनी अप्पूघर उद्यानाची पाहणी केली. त्या वेळी महापौरांनी नाराजी व्यक्त केली. त्या वेळी नगरसदस्य शर्मिला बाबर, सहायक आयुक्त आशा राऊत, अप्पूघरचे संचालक डॉ. राजेश मेहता आदी उपस्थित होते. अप्पूघर हे खासगी संस्थेला चालवण्यास दिले असल्याने महापालिकेचे त्यावर नियंत्रण राहिलेले नाही. येथील अनेक खेळणी बंद पडल्याने पर्यटक कमी झाले आहेत.अप्पूघर येथे असलेली खेळणी खराब झालेली आहेत. त्यांची दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे, नवीन खेळणी बसविणे, अप्पूघरमध्ये मुले व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खेळणी सुस्थितीत ठेवणे, सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे, बंद असलेली खेळणी दुरुस्त करून चालू करणे, अप्पूघर उद्यानात वृक्षारोपण करणे आदी सूचना महापौर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.महापौर राहूल जाधव म्हणाले, ‘‘अप्पूघर हे काही वर्षांपूर्वी शहराची ओळख होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अप्पूघर विषयी तक्रारी येत आहेत. खेळणी बंद असल्याने पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेने बसविलेली व ठेकेदारामार्फत बसविलेली खेळणींची माहिती मागविली असून, अप्पूघर संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल. हा प्रकल्प सुरू राहून पर्यटनविकासाला चालना मिळण्याची गरज आहे.’’
अप्पूघरमधील खेळण्याची दुरुस्ती करा : राहुल जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 12:50 AM