नाराजांचे राजीनामास्त्र म्यान, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:29 AM2018-03-06T03:29:21+5:302018-03-06T03:29:21+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षनिवडीवरून चार दिवसांपासून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी सुरू केलेले बंड आज शमले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांशी मुंबईत सोमवारी चर्चा केली.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षनिवडीवरून चार दिवसांपासून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी सुरू केलेले बंड आज शमले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांशी मुंबईत सोमवारी चर्चा केली. त्यामुळे राजीनामास्त्र म्यान केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. त्यामुळे महापौर नितीन काळजे यांना अभय मिळणार आहे.
महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदावरून सत्ताधारी भाजपात वादळ सुरू झाले आहे. पाच हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाºया महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या समर्थकांच्या हाती घेण्यासाठी भाजपातील स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा लागली होती. अध्यक्षपदासाठी निष्ठावान विलास मडिगेरी, शीतल शिंदे, राहुल जाधव यांच्या नावाची चर्चा होती. प्रत्येकाने १०० टक्के निवडीचा दावाही केला होता. त्यामुळे तिघांपैकीच एकाला संधी मिळेल, असे चित्र होते. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ अगोदर माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांची पत्नी ममता गायकवाड यांचे नाव पुढे आले.
गायकवाड यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड निश्चित असून, सात मार्चला त्यांच्या नावावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल. त्या भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक आहेत. अध्यक्षपदासाठी राहुल जाधव यांना डावलल्याने आमदार लांडगे यांच्या गटाने बंड पुकारले होते. महापौर नितीन काळजे, स्थायी सदस्य राहुल जाधव, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामा दिला. जुने निष्ठावान शीतल शिंदे यांनीदेखील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षांतर्गत बदलांची दखल भाजपाच्या नेतृत्वाने
घेतली. गेल्या दोन दिवसांपासून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महापालिकेतील बैठकीस उपस्थिती
राजीनामा दिल्यानंतर महापौर महापालिका भवनात येणार की नाहीत, याबाबत उत्सुकता होती. राजीनामास्त्र म्यान होणार, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. आजच्या महापालिकेतील बैठकीस महापौर उपस्थित होते. त्यावरून राजीनामास्त्र म्यान केल्याचे दिसून आले. याबाबत महापौरांनी कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. हा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेल्याचे सांगितले. महापौर नितीन काळजे म्हणाले, की आम्ही आमचे राजीनामे शहराध्यक्षांकडे दिले होते. याबाबत शहरातील दोन्ही आमदार निर्णय घेतील.