पिंपरी : शहर पोलीस दलाला आणखी तीन वरिष्ठ अधिकारी मिळणार आहेत. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एक अपर पोलीस आयुक्त तसेच दोन पोलीस उपायुक्त अशा तीन पदांना मान्यता देण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याबाबत विविध पदांचा प्रस्ताव आयुक्तालयाकडून सादर करण्यात आला आहे. आयुक्तालयासाठी सध्या एक अपर पोलीस आयुक्त तसेच तीन पोलीस उपआयुक्त कार्यरत आहेत. नवीन पद मंजुरीमुळे आता अपर आयुक्तांची संख्या दोन तर उपायुक्तांची संख्या पाच होणार आहे.
सध्याचे अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे प्रशासनासह इतर सर्व विभागांचा पदभार आहे. आणखी एक अपर आयुक्त उपलब्ध होणार असल्याने या कामकाजाची विभागणी होणार आहे. प्रशासन, मुख्यालय, गुन्हे शाखा तसेच परिमंडळ, वाहतूक शाखा अशा पद्धतीने जबाबदारीचे वाटप होऊ शकते. तसेच दोन नवीन उपायुक्त उपलब्ध झाल्यानंतर सध्याच्या दोन परिमंडळांमध्ये वाढ होऊन एकूण तीन परिमंडळ होणार आहेत. तसेच वाहतूक व गुन्हे शाखेचा पदभार स्वतंत्रपणे एका उपायुक्तांकडे देण्यात येणार आहे.
पोलीस ठाण्यांना वित्त विभागाची मंजुरीपोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी रावेत, म्हाळुंगे (चाकण), तसेच शिरगाव चौक्यांना पोलीस ठाण्यांचा दर्जा दिला होता. तसेच पोलीस ठाणे म्हणून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याच्या वित्त विभागाकडूनही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या तीनही पोलीस ठाण्यांना अंतिम मंजुरी मिळाली आहे.