पिंपरी : ‘दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील २९ रुग्णांचे पुण्यातील एनआयव्हीमध्ये घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एनआयव्हीने राखून ठेवलेला एका रूग्णाचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्या १५ वर पोहोचली आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी शुक्रवारी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. शहरातून आजपर्यंत एकूण ३९६ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ३२९ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. उपचारार्थ दाखल चार जणांची प्रकृती स्थिर आहे.गुरूवारी ३९ व्यक्तींचा घश्यातील द्राव्याचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. तपासणीसाठी पाठविलेले अहवाल अजून आलेले नाही.
निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झालेल्या २३ जणाचे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जण अशा एकुण २९ रूग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी दोघांचे अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आले होते. तर उर्वरीत २६ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले होते. तर एकाचा अहवाल थांबून ठेवला होता. तो अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कारोना रूग्णात एकाने भर पडून १५ झाली आहे. यापूर्वी उपचार घेऊन डिस्चार्ज केलेल्या रूग्णांची संख्या अकरा असून आता महापालिका रूग्णालयात उपचार घेणाºया रूग्णांची संख्या चार झाली आहे.महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ‘‘दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या २३ जण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या एकुण २९ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी एक शिल्लक अहवाल आज मिळाला आहे. तो पॉझिटिव्ह आला आहे. दिल्लीला कार्यक्रमास गेलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली आहे.’’