लिलाव भिशीचे आठ लाख केले हडप
By admin | Published: August 18, 2015 11:57 PM2015-08-18T23:57:07+5:302015-08-18T23:57:07+5:30
महापालिकेत भूमी जिंदगी विभागात लिपिक पदावर काम करणाऱ्या एकाने महापालिकेत विविध विभागांत नोकरीस असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना लिलाव भिशीत
पिंपरी : महापालिकेत भूमी जिंदगी विभागात लिपिक पदावर काम करणाऱ्या एकाने महापालिकेत विविध विभागांत नोकरीस असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना लिलाव भिशीत पैसे गुंतविण्यास भाग पाडले. सप्टेंबर २००९ पासून त्यांच्याकडून दरमहा वसूल केलेले सुमारे आठ लाख रुपये हडप केले असून, कोणालाही भिशीची परतावा रक्कम दिलेली नाही.
आर्थिक फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यांना चिंचवड पोलिसांनी बुधवारी बोलावले असून, त्यांचे म्हणणे एकूण घेऊन तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
लिलाव भिशीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे पैसे उकळण्याचा उद्योग करणारा हा महापालिकेचा कर्मचारी स्थानिक (गाववाला) आहे. त्याचा प्रशासनात दबदबा असल्याने आतापर्यंत घडल्या प्रकाराबाबत आवाज उठविण्यास कोणीच पुढे येत नव्हते.
अरविंद अटकर मंगळवारी भिशीच्या परताव्याचे पैसे मागण्यासाठी गेले. त्यांना उद्धट वागणूक देऊन मारहाण करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी या भिशीत पैसे गुंतविले आहेत, अशा अन्य सहकाऱ्यांना घेऊन मंगळवारी दुपारी अटकर चिंचवड पोलीस ठाण्यात गेले. सविस्तर माहिती घेऊन बुधवारी या प्रकरणी दखल घेतली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर तक्रार देण्यास गेलेले महापालिकेचे कर्मचारी परत आले. (प्रतिनिधी)