बारामती : गेल्या दोन मीहन्यांपासून बारामती शहरात सुरू असलेली डेंग्यूची साथ अटोक्यात आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यात आता गोचीड तापाचीही भर पडली आहे. दरम्यान, करमाळा तालुक्यातून बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ आलेल्या प्रसुती झालेल्या महिलेचा नुकताच डेंग्यूने मृत्यू झाला आहे. नगरपालिका प्रशासनाने कोरडा दिवस पाळणे, धुराळणी करणे सारख्या उपाय योजना देखील केल्या. मात्र, या उपाय योजना अपयशी ठरल्या आहेत. डेंग्यूवर प्रभावीपणे उपाय योजना करण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे सध्या आढळणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांवरून स्पष्ट होत आहे. गेल्या महिन्यात महावितरणचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना डेंग्यूने कवेत घेतले होते. त्यापाठोपाठ पोलीस अधिकाऱ्याला देखील डेंग्यूची लागण झाली आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहरात आढळणाऱ्या या आजाराच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनान तातडीच्या उपाय योजना सुरू केल्या आहेत. पाच धुराळणी यंत्राद्वारे शहरामध्ये फवारणी सुरू आहे. त्यामध्ये आणखी धुराळणी यंत्राची मागणी करण्यात आली आहे. नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका, इतर स्टाफसह शहरात सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. दिवाळीनंतर २८ आॅक्टोबर रोजी कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक मंगळवारी, कोरडा दिवस पाळण्यात येईल. याशिवाय डासांची उत्पत्ती होणारे ठिकाणे, अस्वच्छता दूर करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. डेंग्यू आजाराबाबत जनजागृतीसाठी ध्वनीक्षेपक, केबलद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप आदींच्या उपस्थितीत या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यामध्ये उपाय योजनेचे स्वरूप ठरविण्यात आले आहे.सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे डॉ. बापू भोई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहरात तापाचे रुग्ण आढळत आहे. मात्र, राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेच्या अहवालाशिवाय डेंग्यूची लागण झाल्याबाबत दुजोरा देणे योग्य नाही. रुग्णांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांवरून विशेषत: प्लेटलेट्सचा संख्यावरून उपचार करण्यात येत आहे. नागरिकांनी आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या आळ्या होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी. (प्रतिनिधी)
बारामती ‘ताप’ली
By admin | Published: October 23, 2014 5:20 AM