'भोलेनाथ’, ‘शंकर’च्या ‘एक्झिट’ने पोळ्याचा नैवेद्य लागेना गोड, नंदीवाल्यांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:57 AM2021-10-07T10:57:39+5:302021-10-07T11:15:49+5:30
जेव्हा आम्ही नंदीचे खेळ करतो तेव्हा शिधा मिळतो तेव्हा त्यांची आठवण होते आत्ता मंदिरही सुरू होत असल्याने काही मंडळी विविध तीर्थक्षेत्री उदरनिर्वाहासाठी काही बैलांना घेऊन गेली आहेत. पण भोलेनाथ आणि शंकराची आम्हाला सतत आठवण येत असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.
पिंपरी : चाऱ्याअभावी भुकेने तडफडत सहा वर्षे वयाच्या भोलेनाथ या नंदीने एप्रिलमध्ये जगाचा निरोप घेतला त्यापाठोपाठ ‘शंकर’ नावाच्या नंदीचाही अचानक मृत्यू झाला. सहा महिन्यांत दोन नंदीबैल दगावल्याने नंदीवाले भावनिकदृष्ट्या खचले होते, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. आज बैलपोळ्यानिमित्त भोलेनाथ व शंकर या बैलांची आठवण मानसिंग वाकोडे यांना झाली. नवीन बैल खरेदी करायचे आहे, तसेच त्याचे प्रशिक्षणही. परंतु पैसे नसल्याने त्यात अडचणी येत आहे, आम्हाला त्यासाठी मदतीची गरज आहे.
बैलपोळा बुधवारी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने नंदीबैल वाल्यांशी संवाद साधला. वाल्हेकरवाडी येथील पवना नदीच्या परिसरात नंदीवाल्यांचे २५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे नंदीबैल तसेच इतर जनावरेही आहेत. यातील पाच ते सहा कुटुंबांतील प्रत्येकी एक सदस्य मिळून एक नंदी घेऊन शहर परिसरात फिरून, तर काही वासुदेव बनून उदरनिर्वाह चालवतात. भोलेनाथ व शंकर यांची आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अभिमानाने सांगत होते की त्यांनी काही चित्रपटात कामही केले. जान, भाई, बापू बिरू वाटेगावकर ह्या चित्रपटात तर काही जाहिरातीतही काम केले.
वेगवेगळ्या सोसायटीत, गल्लीबोळांत जेव्हा नंदीचे खेळ आम्ही दाखवायचो तेव्हा लहानपणापासून मोठ्या थोरांपर्यंत सगळे कौतुक करायचे. मालकाच्या सांगण्यावरून मान डोलावतो, मालकाला इजा न करता मालकाच्या छातीवर दिमाखदार पद्धतीने उभा राहतो. आता हळूहळू सर्व सुरळीत होत आहे. उरलेल्या ४ बैलांना घेऊन विविध ठिकाणी जेव्हा आम्ही नंदीचे खेळ करतो तेव्हा शिधा मिळतो तेव्हा त्यांची आठवण होते आत्ता मंदिरही सुरू होत असल्याने काही मंडळी विविध तीर्थक्षेत्री उदरनिर्वाहासाठी काही बैलांना घेऊन गेली आहेत. पण भोलेनाथ आणि शंकराची आम्हाला सतत आठवण येत असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.