Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोसरीत 'जय श्रीराम' गजर; भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक, ६३ हजार मतांनी विजयी
By प्रकाश गायकर | Published: November 23, 2024 03:08 PM2024-11-23T15:08:16+5:302024-11-23T15:10:41+5:30
Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली असून शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांचा पराभव केला
Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live : भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे हे 63 हजार 634 मतांनी विजयी झाले. त्यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली. त्यांनी महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव केला. लांडगे यांच्या विजयानिमित्त भोसरी परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे. तसेच महेश लांडगे यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्या फेरीचा निकाल हातात येण्यास पावणे अकरा वाजले. सुरुवातीला मतमोजणीचा वेग संथ होता. मात्र, नंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मतमोजणी केंद्रावर पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली.
पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीला निकालाची उत्सुकता कायम होती. लांडगे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. तीन वाजेपर्यंत मतमोजणीच्या 23 फेऱ्या पूर्ण झाल्या. पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे आघाडीवर होते तर दुसऱ्या क्रमांकावर अजित गव्हाणे होते. लांडगे यांना 2 लाख 21 हजार 578 मते मिळाली. त्यांचा 63 हजार 634 मतांनी विजय झाला. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव झाला.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
महेश लांडगे यांची पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम होती. विजय घोडदौड सुरू असतानाच दुपारी एक वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' म्हणत जल्लोष केला.