नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक महिन्यानंतर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: March 16, 2023 05:54 PM2023-03-16T17:54:28+5:302023-03-16T17:54:38+5:30
अनोळखी चालकाच्या दुचाकीने धडक दिल्याचे निष्पन्न झाल्यावर अनोळखी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
पिंपरी : दुचाकीच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला. नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी येथे जयगणेश साम्राज्य चौकात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी तपास करून याप्रकरणी अज्ञात चालकाच्या विरोधात एक महिन्यानंतर गुन्हा दाखल केला.
महादेव बबन कान्हूरकर (वय ४२) असे अपघातातमृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १५) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती महादेव कान्हूरकर हे त्यांच्या दुचाकीवरून १६ फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास स्पाईन रस्त्यावरून खडी मशीनकडे जात होते. त्यावेळी नाशिक-पुणे महामार्गावर गणेश साम्राज्य चौक येथे भोसरीकडून येणाऱ्या एका अनोळखी चालकाच्या दुचाकीने महादेव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात महादेव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अनोळखी दुचाकीचालक घटनास्थळी न थांबता भरधाव निघून गेला.
महादेव यांचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार याप्रकरणी सुरवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता, एका अनोळखी चालकाच्या दुचाकीने महादेव यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अनोळखी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार दीपक रणसौर तपास करीत आहेत.