गणेश तलावात भरली पक्ष्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:35 AM2018-05-07T03:35:19+5:302018-05-07T03:35:19+5:30
प्राधिकरणातील गणेश तलाव परिसरात रविवार सकाळी आठची वेळ..., उन्हाळा सुरू असला, तरी वातावरणात थोडासा गारवा..., अशा रम्य, सुखद वातावरणात प्राधिकरणातील गणेश तलावात पक्ष्यांची शाळा भरली होती. चित्रबलक, पांढरे बगळे, खंड्या आदी पक्षी जमले होते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि मैना- कोकीळेचे गुंजन सुरू होते. हे मनोहारी दृष्य टिपण्यात मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक व्यक्त होते. त्यांनाही छायाचित्रणाचा मोह आवरता आला नाही.
पिंपरी - प्राधिकरणातील गणेश तलाव परिसरात रविवार सकाळी आठची वेळ..., उन्हाळा सुरू असला, तरी वातावरणात थोडासा गारवा..., अशा रम्य, सुखद वातावरणात प्राधिकरणातील गणेश तलावात पक्ष्यांची शाळा भरली होती. चित्रबलक, पांढरे बगळे, खंड्या आदी पक्षी जमले होते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि मैना- कोकीळेचे गुंजन सुरू होते. हे मनोहारी दृष्य टिपण्यात मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक व्यक्त होते. त्यांनाही छायाचित्रणाचा मोह आवरता आला नाही.
हिवाळ्यामध्ये अनेक पक्षी पिंपरी-चिंचवड परिसरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठी येत
असतात. तसेच पिंपरीतील टाटा मोटर्सच्या सुमंत सरोवर, तसेच गणेश तलाव येथेही मोठ्या प्रमाणावर पक्षी येत असतात. उन्हाळा सुरू झाला असला, तरी सकाळच्या वेळी अजूनही अनेक पक्षी पानवठ्याच्या परिसरात दिसून येतात.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने प्राधिकरणातील गणेश तलाव परिसराचा विकास केला आहे. मात्र, या तलावाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याने क्षमता असतानाही पर्यटन केंद्र म्हणून विकास झालेला नाही. हिवाळा सरला असला, तरी अजूनही शहर परिसरातील नदीकाठी, पानवठ्यांवर विविध पक्षी दिसताहेत.
जलचरांचे जीव धोक्यात
गणेश तलावात मोठ्या प्रमाणावर मासे आणि अन्य जलचर आहेत. तलावाची पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. तलावात फक्त अर्धा फूट पाणी आहे. हे पाणी उद्यान परिसरात पुरविले जात असल्याने पाण्याची पातळी वेगाने कमी होत आहे.
राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष
नदी आणि तलावांच्या
परिसरात असणारे पक्षी आणि जलचर वैभव वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज होती. प्राणी आणि पक्षी संवर्धनासाठी धोरण आखण्याची गरज आहे. यासाठी पक्षिमित्र आणि अभ्यासकांची मदत घ्यायला हवी. प्राधिकरणातील गणेश तलावाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. तलावाची पातळी आणखी खालावली, तर जलचरांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
गणेश तलावाशेजारी उद्यान आहे. त्या उद्यानात सकाळी व सायंकाळी चालण्यासाठी नागरिक येत असतात. आज सकाळी साडेआठच्या सुमारास तलाव परिसरात चित्रबलकाची जोडी आली. ही जोडी पाण्यात मुक्तपणे विहार करीत होती. त्याचवेळी खंड्या, चित्रबलक, बगळेही मोठ्या प्रमाणावर होते. वेळी चित्रबलकाची जोडी पाहण्यासाठी, चालण्यासाठी आलेले नागरिक मोबाइलमध्ये छायाचित्र टिपत होते. पांढरा शुभ्र रंग, लांब चोच आणि पाठीवर शेपटीला लाल गुलाबी रंग यामुळे हे चित्रबलक लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास पाच ते सहा चित्रबलक दिसून आल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले.
शहरात आढळतात हे पक्षी
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा या नद्या जातात. तसेच गणेश तलाव, सुमंत सरोवर, तसेच अनेक पानवठे आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे, बेडूक, खेकडे, तसेच वेगवेगळे जलचर प्राणी आहेत. नद्या प्रदूषित होत असल्याने जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. या परिसरात चिमण्या, कावळे, घुबड, वारकरी, क्लवा, वंचक, बगळा, टिबुकली, किंगफिशर, मध्यम बगळा, पारवे, मैना, प्लवा बदक, खंड्या आदी पक्षी आढळतात. तसेच सुमंत सरोवरावर चित्रबलकांचे अधिवास आहेत. त्यामुळे सरोवराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चित्रबलक दिसून येतात.
चित्रबलाक (पँटेड स्टोर्क) हा निवासी पक्षी असून, नदी, तलाव दलदल अशा पाणथळ जागी आढळतो. हा अतिशय देखणा पक्षी आहे. मोठी बाकदार चोच, नारिंगी डोके, लाल चेहरा गुलाबी पाय आणि विणीच्या काळात याच्या पाठीखालची पिसे गुलाबी रंगाची होतात. सध्या या पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू झाला आहे. मासे, बेडूक व क्वचित छोट्या पक्ष्यांना मारून खाणारा हा पक्षी आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन आॅफ नेचर या संस्थेच्या रेड डॅटा लिस्टप्रमाणे चित्रबलाक ही प्रजाती धोक्याजवळ पोचलेली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमंत सरोवर येथे ते दिसून येतात. गणेश तलावातील पाणी कमी झाल्याने चित्रबलक आले आहेत. तळ्यांचे नैसर्गिकपण जपून पक्षी आणि जलचरांचे संवर्धन करण्याची गरज आहे.
- उमेश वाघेला, पक्षी अभ्यासक, अलाईव्ह
जलचर, पक्षी वैभव वाचविण्यासाठी
शहर परिसरात विविध ठिकाणी खाणी आहेत. तलावांचा नैसर्गिकपणा कायम ठेवावा. कॉँक्रिटीकरण रोखण्याची गरज आहे.
तलावाकाठची काटेरी, उंच झाडे, झुडपे यांची जपणूक करावी. वेलींचे संवर्धन देणे गरजेचे आहे.
तळे किंवा नद्यांतील गाळ शास्त्रीय पद्धतीने काढण्याची गरज आहे. जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
पक्ष्यांचे अधिवास जपण्यासाठी राजकीय आणि प्रशासनाने धोरण तयार करण्याची गरज आहे.