पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावचा रस्त्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. लष्कराने उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाचे पत्र मिळाले आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.बोपखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने २०१५मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत करावा, यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र, अद्याप यश आले नाही.आमदार लक्ष्मण जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी उड्डाणपूल व रस्त्यासाठी लष्कराने ना हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक जागा द्यावी, अशी मागणी केली होती. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, अरुण जेटली आणि विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. अखेर लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. संयुक्त सचिव मनीष ठाकूर यांनी जगताप यांना पत्रद्वारे कळविले.
पुणे: बोपखेल प्रश्न सुटणार? उड्डाणपुलाला लष्कराकडून जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 6:58 AM