सळईच्या चटक्यांनी बेजार भावंडांनी सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 03:58 AM2018-12-14T03:58:59+5:302018-12-14T03:59:08+5:30
सख्खे वडील-सावत्र आईने केला अमानुष छळ
पिंपरी : घराची स्वच्छता केली नाही, खिशात खाऊ का घेतला, अशा किरकोळ कारणांवरून कधी लाकडी दांडक्याने मारहाण, तर कधी लोखंडी सळईने पोटावर, हाता-पायांवर चटके दिले जातात. सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांकडूनच अशी वागणूक मिळत होती. हा छळ असह्य झाल्याने नऊ वर्षांचा महेश आणि सात वर्षांच्या वैष्णवीने घर सोडून जाण्याचा निश्चय केला.
शाळेच्या गणवेशातच हे बहीण-भाऊ गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घराबाहेर पडले. नाशिक फाटा, कासारवाडी येथे ते लातूरला जाणाऱ्या एसटी बसची चौकशी करू लागले. शंका आल्याने काही नागरिकांनी विचारपूस केल्यानंतर मुलांनी घडल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी मुलांना थेट भोसरी पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांचा छळ करणाºया आई-वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
गुंडेराव सूर्यवंशी (रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) असे वडिलाचे तर, गौरी असे या मुलांच्या सावत्र आईचे नाव आहे. या दोघांकडून ६ महिन्यांपासून होणारा छळ चिमुकल्यांना असह्य झाला होता. आई वारंवार काही तरी काम सांगत असे. तिच्या मर्जीप्रमाणे काम न केल्यास ती पतीकडे मुलांची तक्रार करायची. मुलांचे दु:ख समजून घेण्याऐवजी वडील चिमुकल्यांनाच मारायचे. केवळ लाकडी दांडक्याने, घरात मिळेल त्या वस्तूने मारहाण करून ते थांबले नाहीत, तर तापलेल्या सळईने या मुलांच्या पोटाला चटके दिले. अमानुषपणे होणारा छळ
असह्य झाल्याने मुलांनी घरातून पलायन केले.
बुधवारी (दि.१२) दुपारी तीनच्या सुमारास ही भावंडं घर सोडून थेट पुणे-नाशिक महामार्गावर आली. नाशिक फाटा येथे ती एसटी बसची चौकशी करू लागली. शाळेच्या गणवेशातील मुले कोणीही सोबत नसताना कुठे निघाली आहेत, अशी शंका काही प्रवाशांना आली. विश्वासात घेऊन विचारपूस केली, त्या वेळी मुलांनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिली. जागरूक नागरिकांनी शाळेच्या गणवेशातील दोघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे नेले.
सख्खी आई लातूरला; दुसºया पत्नीच्या मर्जीखातर छळ
पोलिसांपुढे मुलांनी माता-पित्याचे कारनामे सांगितले. या मुलांची सख्खी आई लातूरला असते. त्यामुळे तिच्याकडे जाण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. फिर्याद दाखल करून त्यांना त्रास देणाºया त्यांच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली.
छळ करणाºया माता-पित्यांच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न करणाºया बहीण, भावाला पोलिसांनी पहिल्यांदा रुग्णालयात नेले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. दोघांनाही बालसुधारगृहात पाठविण्यात आले. मुलांचे वडील हे मूळचे लातूरचे आहेत. बारावी शिकलेल्या या गृहस्थाने पहिल्या पत्नीला सोडून दिल्यानंतर दुसºया महिलेशी विवाह केला. पहिल्या पत्नीच्या दोन मुलांना घेऊन तो दुसºया पत्नीबरोबर राहू लागला. दुसरी पत्नी सोडून जाऊ नये, यासाठी तिची मर्जी जपण्याच्या नादात त्याने मुलांचा अमानुष छळ केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.