बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:59 AM2018-04-20T02:59:37+5:302018-04-20T03:09:23+5:30
जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादंगातून हिंजवडी येथे बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी सात ते आठ आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादंगातून हिंजवडी येथे बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी सात ते आठ आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास हिंजवडी फेज-२ येथे घडली. या प्रकरणी कंपनीच्या संचालिका नंदनी कोंढाळकर (वय ४८, रा. हिंजवडी, फेज-२) यांनी अज्ञातांविरुद्ध हिंजवडी ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी कोंढाळकर यांचे हिंजवडी फेज-२ येथे डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. त्या कंपनीच्या संचालिका आहेत. २००७ मध्ये कोंढाळकर यांनी आरोपींकडून मौजे माण गट नं. ३९१ येथील जमीन कायदेशीररीत्या खरेदीखत करून विकत घेतली. त्यावर खरेदीखत करून देणाऱ्यांनी फिर्यादी कोंढाळकर यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. दाव्याचा निकाल फिर्यादीच्या बाजूने लागला. याचा राग आल्याने सात ते आठ जण हातात कोयते, लाकडी दांडके व दगड घेऊन कोंढाळकर यांच्या हिंजवडी येथील कार्यालयात शिरले. सुरक्षारक्षकाला मारहाण केली. कंपनीच्या कार्यालयाबाहेर उभ्या वाहनांची व कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून ते पसार झाले.