देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत वैकुंठगमन मंदिर परिसरात भव्य तीन मजली भक्त निवास व अन्नछत्र उभारण्यात आले आहे. यासाठी शासनाने ९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या निधीतून या भक्तनिवासाचे किरकोळ काम सोडता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या पालखी सोहळ्यात या भक्तनिवासाचे कागदोपत्री अधिकृती संस्थानकडे हंस्तातरण करण्यात येणार आहे. या ९ कोटी रुपयांमध्ये वैकुंठगमन स्थान परिसर व विकास सुधारणेअंतर्गत महाद्वार, भक्तनिवास, अन्नछत्र, तुकाराम महाराज जीवन संग्रहालय, सभामंडप, चप्पल स्टँड आदींचा समावेश आहे. तळमजल्यावर पार्किंग, पाणपोई, चप्पल स्टँड असणार आहे. याशिवाय अन्नछत्र कक्ष, प्रतीक्षा कक्ष, हातधुण्याची खोली, स्वच्छतागृह, धुण्याची खोली, स्वयंपाकगृह, भांडारगृह, संत तुकाराममहाराज जीवन संग्रहालय दालन, जीवन संग्रहालयासाठी प्रतीक्षालय, पहिल्या मजल्यावर छात्रावास, शौचालये, विश्रामगृह, प्रतीक्षागृह, कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर छात्रवास, विश्रामगृह, प्रतीक्षागृह, कार्यालय कक्ष, पाणपोई, अशा ९-९ अशा १८ खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये विद्युतपुरवठा कामे झाली आहेत. विद्युत उपकरणे बसविण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात असून, पालखी सोहळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. याच इमारतीच्या आवारात १२ शिल्पाद्वारे श्रीसंत तुकाराम महाराजांचा जीवनपटच स्वतंत्र भिंतीवर फायबर ग्लासमध्ये उभारला आहे. या शिल्पांना रंगीत रोषणाई केली असल्याने हे भाविकांचे दर्शनापाठोपाठ मुख्य आकर्षण असणार आहे. काही कामे सुरू असून, ती पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. यानंतरच या इमारतीचे हस्तांतरण होणार आहे.
देहू येथील भक्तनिवासाचे होणार हस्तांतरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 2:21 PM
वैकुंठगमन मंदिर परिसरात भव्य तीन मजली भक्त निवास व अन्नछत्र उभारण्यात आले आहे...
ठळक मुद्दे१२ शिल्पाद्वारे श्रीसंत तुकाराम महाराजांचा जीवनपट पालखी सोहळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार