सण ना सुद तरी फटाक्यांचा धूर, दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल, नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:33 AM2018-08-18T00:33:49+5:302018-08-18T00:34:18+5:30
शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठ मोठे फटाके वाजत असून, हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून फटाक्याच्या स्फोट सारखा आवाज काढला जातो आहे.
कामशेत - शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठ मोठे फटाके वाजत असून, हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून फटाक्याच्या स्फोट सारखा आवाज काढला जातो आहे. काही खोडसाळ व टवाळखोर तरुण हे प्रकार करत असून, त्याचा रस्त्याने जाणारे इतर वाहनचालक, पादचारी, रुग्ण व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या शिवाय शहरातील मुख्य रस्त्यावर शालेय विद्यार्थिनी व महिला यांच्या शेजारी दुचाकीवर विविध प्रकारचे स्टन्ट करणारे त्यांच्यामुळे वाहतुकीस अडचण होत आहे.
शहरात सध्या बुलेट व इतर स्पोर्ट्बाईकची क्रेज वाढली असून, सुसाट निघालेल्या तरुण पिढीतील काही उनाड व टवाळखोर मुलांकडून या वाहनांचा वेगळ्या कारणासाठी उपयोग होत आहे. शहरात काही महिन्यांपासून बुलेट व इतर मॉडिफाइड स्पोर्ट्बाईकच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून मिसफायरिंगच्या नावाखाली मोठ्या फटाक्यांच्या स्फोटाचे आवाज काढले जात आहेत.
वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. तसेच पवनानगर व लोणावळा भागात वर्षाविहारासाठी पर्यटकांकडून चिरीमिरी गोळा करण्यात वाहतूक विभाग मश्गुल आहे. शहरात ठरावीक ठिकाणी या दुचाकींवर वेगवेगळे स्टन्ट करणे, या दुचाकी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून भरधाव चालवणे, पादचाऱ्यांना कट मारणे या सारख्या प्रकारांमुळे नागरिक हैराण झाले असून, रस्त्यावरून जाणाºया इतर वाहनचालक दचकून बाजूला होत आहेत. तर पादचाºयांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. शहरातील विद्यालय, शाळा, खासगी शिकवण्या भरणे व सुटण्याच्या वेळेत या टवाळखोर मुलांना जास्तच चेव चढत असल्याचे बोलले जात आहे. स्टंटबाजी करणारे युवक वाहनचालकांना दमदाटी करतात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हुल्लडबाज तरुणांवर प्रशासनाने कारवाई करावी तसेच अल्पवयीन चालकांची मोठ्याप्रमाणात संख्या वाढत असून, त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.
पोलीस महानिरीक्षकाचे आदेश वा-यावर
सध्या मावळात स्पोर्ट व मोडिफाय दुचाकी वाहनांची मोठी के्रझ वाढली असून, एकेकाळी एखाद दुसरी दिसणारी बुलट अथवा स्पोर्टबाईक गाडी आत्ता दर पाच मिनिटांनी रस्त्यावरून जाताना दिसते. याचबरोबर इतर मोडिफाय गाड्याही दिसू लागल्या आहेत. काही खोडसाळ तरुण या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये ठरावीक बदल करून मिस फायरिंगच्या नावाखाली मोठे फटाक्यासारखे आवाज काढत असून, आजूबाजूला जाणाºया इतर वाहनांवरील चालक दचकून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मावळासह कामशेत शहरात त्यामुळे दिवसभर फटाक्यांचे भयंकर आवाज होत असतात. मागील वर्षी कामशेत येथे नागरिकांबरोबर झालेल्या चर्चा सत्रात कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही मान्य केले की, मावळात बुलेट गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्थानिक पोलीस अधिकाºयांना मोडिफाय वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र वाहतूक पोलिसांची एक वर्षांपासूनची उदासीनता कायम आहे.