पिंपरी : कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून ज्यादा पैशांच्या परताव्याचे व थायलंड टूरचे आमिष दाखवून आठ लाख ५५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. मोशी प्राधिकरण येथे जून २०१८ पासून २० एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
प्रचंड दादासाहेब भुसारे (वय ४२, रा. डोणगाव, ता. केज, जि. बीड) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि २०) फिर्याद दिली आहे. ड्रीमव्हिजन ४ यू प्रा. लि. मोशी या कंपनीचा सीएमडी दिनेश कुरकुटे, संचालक दीपिका दिनेश कुरकुटे, प्रतिनिधी विनायक शिरोळे, उपाध्यक्ष नवनाथ मगर, सीओ अमितकुमार पोंदे, कॅशियर नितीन कुरकुटे, अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. ग्राहकाने कंपनीत साडेसात हजार रुपये गुंतवल्यास कंपनी त्याला एक प्रॉडक्ट देऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून 'आयडी' देणार. त्या ग्राहकाने दोन ग्राहक आणून दिले तर कंपनी त्याला ५०० रुपये कमिशन व रॉयल्टी म्हणून दर महिन्याला एक हजार ५०० हजार रुपये त्यातून १० टक्के रक्कम कपात करून एक हजार २७५ रुपये देणार, एसीएम प्लॅनमध्ये सात हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केलेल्या ग्राहकाने २७ ग्राहक आणून दिले तर कंपनी त्या ग्राहकाला १३ हजार ५०० कमिशन व रॉयल्टी म्हणून दर महिन्याला १९ हजार ५०० रुपयांमधून १० टक्के रक्कम कपात करून १६ हजार ५७५ रुपये, असे २४ महिने राॅयल्टी व एक थायलंड टूर देणार, तसेच कंपनी प्रत्यक्ष ग्राहकाला कंपनीच्या नफ्यातील पाच टक्के रक्कम देणार असल्याचे ज्यादा पैशांच्या परताव्याचे व थायलंड टूरचे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादीकडून आठ लाख ५५ रुपये घेऊन रॉयल्टी म्हणून फिर्यादी एकूण ९२ हजार २७५ रुपये देऊन प्लॅन प्रमाणे २४ महिने रॉयल्टी थायलंड टूर व कंपनीच्या नफ्यामधील पाच टक्के रक्कम न देता फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीकडून जमा रकमेचा अपहार केला. आरोपींनी फिर्यादी प्रमाणे त्यांच्या तालुक्यातील इतर लोकांची फसवणूक केली आहे.