पालिकेच्या निष्काळजीपणाने कुटुंबाने गमावला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:31 AM2018-11-26T00:31:04+5:302018-11-26T00:31:19+5:30
भोसरी : दुुभाजकातील दिव्याच्या खांबाचा शॉक बसून शिक्षकाचा मृत्यू
पिंपरी : महापालिकेच्या विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विजेच्या खांबाचा शॉक बसून कुटुंबातील एकमेव कमावता असलेल्या शिक्षक तरुणाचा नाहक बळी गेला. चेतन प्रकाश जाधव (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले. घरी पत्नीसह वयस्क आई-वडील, महाविद्यालयीन शिक्षण घेणारा भाऊ असा परिवार... आधारच गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला... निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासह कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
चेतन हे २ आॅक्टोबरला पत्नी किरण यांच्यासह दुचाकीवरून भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून पुणे-नाशिक महामार्गावरून घरी परतत असताना रात्री आठच्या सुमारास भोसरी येथे पोहोचले. दरम्यान, राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ त्यांची दुचाकी पंक्चर झाली. पंक्चर काढणाºया दुकानाचा शोध घेत असताना, एकाने माहिती पुरविली, की पंक्चर काढणारे दुकान रस्त्याच्या पलीकडील बाजूस आहे. त्यावर चेतन यांनी दुचाकी जागेवरच ठेवून पत्नी किरण यांना तेथे थांबण्यास सांगितले. चेतन रस्ता ओलांडून पलीकडील बाजूस जाऊ लागले. त्याच वेळी रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला चेतन यांचा हात लागला आणि खांबाचा शॉक बसल्याने ते खांबालाच चिकटले. हा प्रकार पत्नी किरण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेत आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलाविले. त्यांपैकी एकाने लाकडाच्या दांडक्याच्या साहाय्याने चेतन यांना बाजूला घेतले. त्यांना उपचारासाठी तातडीने भोसरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, तेथे उपचारादरम्यान चेतन यांचा मृत्यू झाला.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
चेतन यांचे ६ मे २०१८ रोजी लग्न झाले होते. त्यांच्या कुटुंबात पत्नीसह वयस्कर आई-वडील असून, छोटा भाऊ केतन अद्याप महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. चेतन हे कमावणारे कुटुंबातील एकमेव होते. ते पुण्यातील सुखसागरनगर येथील रामराज्य माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. या घटनेमुळे कुटुंबाचा आधारच गेला असून, पुढे काय होणार असा प्रश्न कुटुंबापुढे उभा ठाकला आहे.
चेतन यांच्या मृत्यूस पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. पथदिव्यांच्या खांबाच्या वायर योग्य पद्धतीने जोडलेल्या नव्हत्या. यामुळे खांबामध्ये वीजप्रवाह उतरला. याच खांबाला चेतन यांचा हात लागल्याने शॉक बसून, त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप चेतन यांचे बंधू केतन जाधव यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेस जबाबदार असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी. तसेच कुटुंबाला महापालिकेने नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी केतन यांनी केली आहे.