पिंपरी शहराच्या महापौर पदावर चिंचवड मतदारसंघाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 01:39 PM2019-11-16T13:39:12+5:302019-11-16T13:43:46+5:30
चिंचवडमधील कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष
पिंपरी : स्थायी समिती सभापती आणि महापौर ही दोन पदे भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये दिली आहेत. पुढील वर्षी पदांमध्ये खांदेपालट होऊन स्थायी समिती अध्यक्षपद भोसरीकडे आणि महापौरपद चिंचवडला जाणार आहे. त्यामुळे चिंचवडमधील कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
शहराचे महापौरपद आगामी अडीच वर्षाकरिता महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्ताधारी भाजपाकडून खुला प्रवर्गातून २१ महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील इच्छुकांनी आपल्या नावाची वर्णी लागण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरामध्ये भाजपामध्ये शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे दोन गट आहेत. तर, खासदार अमर साबळे यांच्यासह निष्ठावंतांचा तिसरा गट आहे. अडीच वर्षात महापालिकेतील पदे आमदारांच्या शिफारशीनुसारच दिली आहेत. त्यामुळे आमदारांचा गट महापालिकेच्या राजकारणात वरचढ ठरला आहे.
चिंचवडलाच मिळणार संधी
पहिले अडीच वर्ष भोसरीकडे महापौरपद राहिले तर स्थायी समिती सभापती पद चिंचवडकडे राहिले. त्यामुळे दुसरे अडीच वर्ष चिंचवडकडे महापौरपद आणि भोसरीकडे स्थायी समिती अध्यक्षपद राहणार असल्याची चर्चा आहे. महापौर पद देताना विधानसभा निवडणुकीतील प्रभागातील मताधिक्य, प्रभागात पक्षाची बांधणीचा निकष ग्राह्य धरला जाण्याची शक्यता आहे.
....
असा होऊ शकतो विचार
४चिंचवडकरांकडे महापौरपद आल्यास ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, आरती चौंधे, झामाबाई बारणे, माया बारणे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे यांचे नाव पुढे येऊ शकते. भोसरीकरांकडे महापौरपद घ्यायचे ठरल्यास निर्मला गायकवाड, प्रा. सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पिंपरीतील अनुराधा गोरखे यांच्या समर्थकांनीही महापौरपदाची मागणी केली आहे. तसेच पिंपरीतून शर्मिला बाबर, सुजाता पालांडे, कोमल मेवाणी यांचाही नावे इच्छुकांमध्ये आहेत.
.............
महापौरपदासाठी दावेदार महिला
शैलजा मोरे, माई ढोरे, नीता पाडाळे, शर्मिला बाबर, संगीता भोंडवे, आरती चौंधे, सुजाता पालांडे, माया बारणे, प्रियंका बारसे, सोनाली गव्हाणे, सारिका सस्ते, निर्मला गायकवाड, भीमाबाई फुगे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, कोमल मेवाणी, सुनीता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौगुले, साधना मळेकर यांचा समावेश आहे.
सोमवारी अर्ज दाखल होणार?
महापौरपदासाठी सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरला सकाळी अकराला निवडणूक होणार आहे.