तळेगाव दाभाडे : येथील नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस मोठ्या पोलीस बंदोबस्तात तळेगाव स्टेशन भागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली़ ही कारवाई यापुढेही चालू राहणार असल्याची चाहूल लागल्याने अधिक नुकसान होऊ नये म्हणून संबंधित नागरिक, व्यापारी आणि टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणातील घर, शेड, टपरी आणि दुकानावरील पत्रे आणि अन्य वस्तू हटविण्यास सुरुवात केली आहे.मुख्याधिकारी वैभव आवारे आणि तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी स्वत: जातीने लक्ष घालून ही कारवाई केल्याने स्टेशन चौक आणि परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. राजकीय अथवा कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. कारवाईत अतिक्रमणावर हातोडा पडत असल्याने अनेकांनी या कारवाईचा धसका घेतला आहे. अतिक्रमणांवर पुन्हा केव्हाही कारवाई होऊ शकते या धास्तीने स्टेशन आणि गाव विभागातील अतिक्रमणधारकांनी नुकसान टाळण्यासाठी स्वत:हून आपले शेड आणि अतिक्रमणे काढून घेतली आहेत.पोलीस बंदोबस्त उपलब्ध होताच अतिक्रमण विरोधी पथकाने मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पोलिसांच्या फौजफाट्यासह धडक कारवाईचा हातोडा उगारत तळेगाव स्टेशन ते एसटी डेपो या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईस विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. सलग दुसºया दिवशी म्हणजे शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात स्वराज्यनगरी, लोकमान्यनगर, शुभम कॉम्प्लेस परिसर, भाजीमंडई आणि तळेगाव-चाकण रस्त्यावरील नगर परिषदेच्या हद्दीतील अतिक्रमण कारवाई करण्यात आली़दरम्यान, अनधिकृत बांधकामांवर करण्यात येत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी संबंधित नागरिक, व्यापारी आणि टपरीधारकांनी स्वत:हून शेड, अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे. पोलीस बंदोबस्ताच्या उपलब्धतेनुसार कोणत्याही क्षणी गाव विभागात आताही कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले.
नागरिकांनीच स्वत:हून काढली अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:43 AM