पुणे - मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे (सा) अध्यक्ष अमृतकुमार बक्षीलिखित व कल्याणी गाडगीळ अनुवादित ‘मानसिक आजार : पालकांसाठी मार्गदर्शिका’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. विद्याधर वाटवे या वेळी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होते.मानसिक आजारांविषयी सामाजिक परिस्थिती सांगताना डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे मानसिक आजारी व्यक्ती उपचारांपासून वंचित राहतात. त्यांना उपचार मिळण्यास उशीर होतो. अंधश्रद्धेची समस्या केवळ भारतातच नाही तर ती जागतिक आहे. त्यामुळेच मानसिक आजारांबाबत सर्वच देश विकसनशील आहेत.’’डॉ. लुकतुके म्हणाले, ‘‘ हे पुस्तक अतिशय समर्पक, संक्षिप्त व विश्वसनीय आहे. प्रत्येक पालकाने जरुर वाचावे.’’ डॉ. वाटवे म्हणाले, की पुस्तकातील सर्व माहिती विश्वसनीय आहे. मी स्वत: प्रत्येक पालकाला हे पुस्तक घेण्यास सांगेन.अध्यक्षीय भाषणात विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘मानसिक आजाराविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा.’’पुस्तकाच्या अनुवादिका कल्याणी गाडगीळ यांनीही या प्रसंगी पालकांच्या भावनिक व व्यावहारिक समस्या व्यक्त केल्या.‘सा’चे उपाध्यक्ष अनिल वर्तक, विश्वस्त व माजी अध्यक्ष यशवंत ओक, सहकारी मिलिंद भालेकर, याच पुस्तकाचा हिंदी अनुवाद करणाऱ्या प्रभा शेटे, मानसशास्त्रज्ञ अर्चना राठोड यांनीही या प्रसंगी पुस्तकाविषयी आपले अनुभव व विचार व्यक्त केले.‘सा’च्या खजिनदारस्मिता गोडसे यांनी स्वागत केले. केंद्रप्रमुख सारिका चांडक यांनी आभार मानले. कादंबरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.एका मुलीचा पालक म्हणून ज्या कठीण परिस्थितीतून गेलो, त्यातून मी खूप काही शिकलो. २५ वर्षांहूनही अधिक वर्षात मला मिळालेले अनुभव व ज्ञान मी ज्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या बरोबर वाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत या पुस्तकाद्वारे पोचण्याचा माझा प्रयत्न आहे. अज्ञानामुळे मी ज्या चुका केल्या, त्या टाळण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.- अमृतकुमार बक्षी, लेखक
मानसिक आजाराबाबत एकत्रित पावले उचलावीत - डॉ. हमीद दाभोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 3:14 AM