‘वेस्ट टू एनर्जी’वरून गोंधळ, विरोधकांची भाजपातील गटबाजीला फूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:13 AM2018-04-20T03:13:41+5:302018-04-20T03:15:59+5:30
महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. कचरा निविदा, वेस्ट टू एनर्जी आणि राडारोडा प्रकल्पावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून भाजपातील एका गटातील नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असल्याने विरोधकांसह सत्ताधारीही सभेत गोंधळ घालण्याची चिन्हे आहे.
पिंपरी : महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. कचरा निविदा, वेस्ट टू एनर्जी आणि राडारोडा प्रकल्पावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून भाजपातील एका गटातील नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असल्याने विरोधकांसह सत्ताधारीही सभेत गोंधळ घालण्याची चिन्हे आहे.
महापालिकेत सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्यात सत्ताधाऱ्यांना अडचण येत आहे. प्रत्येक सभेत काही तरी गोंधळ होत असतो. सभेच्या दोन दिवस अगोदर या विषयावरून सत्ताधाºयांमध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. भोसरी विधानसभा विरुद्ध चिंचवड असे चित्र पालिकेत तयार झाले आहे.
मोशीत वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पालिकेची जागा २१ वर्षांसाठी प्रकल्पास दिली जाणार आहे. तसेच राडारोडा प्रकल्पदेखील सुरू केले जाणार असून, मान्यतेसाठी हे प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेसमोर ठेवले आहेत. परंतु, या प्रकल्पाला चिंचवड विधानसभेतील नगरसेविका माया बारणे यांनी विरोध दर्शविला आहे. मोशीच्या गांडुळखत प्रकल्पाप्रमाणे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पही वाया जाण्याची भीती आहे.
- महापालिका घनकचºयाच्या विघटनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प २०८ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पासाठी पालिका हिस्सा म्हणून पन्नास कोटी दिले जाणार आहेत. या प्रकल्पाचा ठेकेदार २०८ कोटी रुपयांमध्ये नेमके काय काम करणार आहे, प्रकल्पासाठी लागणारी मशिनरी कोठून आणणार? त्याची किंमत काय? एक टन कचºयापासून किती राख तयार होणार, तसेच निर्माण झालेल्या राखेची विल्हेवाट कशी लावणार, याचा पर्यावरणावर घातक परिणाम होणार नाही का? असे प्रश्न बारणे यांनी उपस्थित केले आहेत.