काँग्रेस गटबाजीचे ग्रहण सुटणार?
By admin | Published: October 2, 2015 12:57 AM2015-10-02T00:57:24+5:302015-10-02T00:57:24+5:30
पिंपरी-चिंचवड शहर काँगे्रसमधील गटबाजी, विरोधी पक्षनेतेपद यासह भोईर, नढे यांचे निलंबन आदी मुद्द्यांवरून बुधवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेतली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर काँगे्रसमधील गटबाजी, विरोधी पक्षनेतेपद यासह भोईर, नढे यांचे निलंबन आदी मुद्द्यांवरून बुधवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेतली. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्या; निलंबन मागे घेऊ, असे प्रदेशाध्यक्षांनी भोईर व नढे यांना सुचविले आहे. असे झाल्यास काँगे्रसमधील गटबाजी संपुष्टात येऊन शहरात पक्षाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घातले आहे. पक्षाला बळकटी देण्यासह अंतर्गत वाद मिटविण्याकडे त्यांचे अधिक लक्ष आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मेळावा घेतला. तर दोनच दिवसांपूर्वी पक्षनिरीक्षक मधु चव्हाण आणि तुकाराम रेगे यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्वांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर पुन्हा बुधवारी मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीला कॉँगे्रसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सर्वांना एकत्रित आणून पक्षाची ताकत कशी वाढविता येईल, यावर विशेष चर्चा
करण्यात आली. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद आणि भोईर, नढे यांचे निलंबन याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षाचा आदेश डावलल्याने भाऊसाहेब भोईर व विनोद नढे यांना पक्षातून निलंबित केले होते. दरम्यान, हे निलंबन मागे घ्यायचे असल्यास प्रथम नढे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भोईर गटाला
सुचविले. राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एक बैठक घेण्यात येईल, त्यानंतर निलंबन मागे घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)