जीवनमान सुधारण्यासाठी सल्लागार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:30 AM2018-05-18T01:30:37+5:302018-05-18T01:30:37+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे, तसेच जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकास होणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे, तसेच जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकास होणार आहे. नागरिकांना दर्जेदार जीवनासह शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेने पॅलेडियम या सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने जीवनमान दर्जा सुधारण्यासाठी शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना केली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘या कार्यालयाद्वारे एक नागरिक प्रतिबद्धता सर्वेक्षण करण्यात येणार असून, यामध्ये सर्वेक्षणामार्फत प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीचे उत्तर देऊन याबाबतचे धोरण बनविले आहे.
नागरिकांना या सर्वेक्षणात भाग घेतल्यावर शहराची सुधारणा करण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या सहभागाच्या उत्तरातून एक नवीन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
धोरणानुसार आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांकडून मिळालेली आवश्यक माहिती, मत व विधान महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांना प्रश्नावली भरण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार असून, सर्वेक्षण पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.’’
नागरिकांकडून भरुन घेणार प्रश्नावली
शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे निर्मितीसाठी प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. नागरिकांची उत्तरे ही उद्दिष्टे तयार करण्याच्या उद्देशाने आहेत. नागरिकांनी प्रश्नावलीमध्ये पोहोचण्यासाठी कोड स्कॅन करुन, ती पूर्ण करून आॅनलाइन जमा करावी. सर्वांसाठी याबाबतची लिंक महानगरपालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही प्रश्नावली जास्तीत जास्त नागरिकांनी भरावी आणि शहराचे धोरण तयार करण्यास जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन दिलीप गावडे यांनी केले आहे.
>शिक्षण समितीवर अनुभवींना मिळणार संधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिक्षण समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. नऊ जणांच्या समितीत शिक्षण क्षेत्राबद्दल आस्था असणारे, उच्चशिक्षित सदस्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. महापालिकांमधील शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तसेच राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे जून २०१७ पर्यंत शिक्षण मंडळ अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. महापालिका आयुक्तांनी शिक्षण समिती बरखास्त केली होती. दोन जूनला आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त केले. शिक्षण समितीत संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. पूर्वी प्रशासकीय सदस्यांसह १५ जणांची समिती होती. त्यात शासनाच्या निर्देशानुसार सुरुवातीला नऊ नगरसेवकांची ही समिती असणार आहे. विविध विषय समित्यांप्रमाणे शिक्षण समितीची निवड झाल्यास संख्याबळानुसार भाजपाचे पाच सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याला संधी मिळणार आहे. शनिवारी नवीन सदस्यांची निवड होणार आहे. सदस्य निवडीबरोबरच सभापती, उपसभापती कोण होणार याबाबत चर्चा रंगली आहे. शिक्षण समितीवर सत्ताधारी भाजपाने उच्चशिक्षित, शिक्षणाविषयी आस्था असणाºया, रस असणाºयांना संधी देण्याचे धोरण कायम केले आहे. शिक्षण विभागाचा कारभार चांगला चालण्यासाठी भाजपाने उच्चशिक्षितांचा विचार केला आहे. त्यात शिक्षक, प्राध्यापिकांचाही समावेश आहे. समितीवर आशा शेंडगे, प्रियंका बारसे, प्रा. उत्तम केंदळे, सुवर्णा बुर्डे, सारिका सस्ते, सोनाली गव्हाणे यांच्या नावाची चर्चा आहे. सभापती आणि उपसभापतिपदासाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीची निवड केली जाणार असल्याचे समजते.