पिंपरी : ज्येष्ठ नागरिकांनी प्रदीर्घ अनुभवाचा फायदा पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी द्यावा, असे आवाहन महापौर शकुंतला धराडे यांनी केले. महापालिकेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, शहर सुधारणा समिती सभापती स्वाती साने, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता मंचरकर, अ प्रभागाध्यक्षा वैशाली काळभोर, फ प्रभागाध्यक्षा शुभांगी बोऱ्हाडे, शिवसेना व आरपीआय महायुती (आघाडी) गटनेत्या सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. महापौर शकुंतला धराडे म्हणाल्या, ‘‘नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा. शहर स्वच्छ राखण्यासाठी घनकचऱ्याचे योग्य नियोजन व्हायला हवे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्न करेल. आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा शहराच्या विकासासाठी सहयोग द्यावा.’’ स्थायी समिती सभापती अतुल शितोळे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा उपयोग कुटुंबातील सदस्यांसाठी करावा. कुटुंबसंस्था बळकट करण्यासाठी प्रत्येकानेच एकमेकांशी आपुलकीने, प्रेमाने वागायला हवे. शहरात जागेच्या उपलब्धतेनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येईल. केवळ भौतिक सुविधा उभारून स्मार्ट सिटी होण्यापेक्षा ज्येष्ठांचे आशीर्वाद व सहकार्य तुमच्या रूपाने मिळत आहे. म्हणून हे शहर संस्कारक्षम स्मार्ट असल्याचे दिसून येते, असेही या वेळी विधी समिती सभापती नंदा ताकवणे, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसदस्या भारती फरांदे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाची संधी द्यावी. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, पी.एम.पी.एम.एल. बस पास सुविधेत सवलत द्यावी, अशी विनंती ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष रतनचंद मेहता यांनी केली. प्रास्ताविक प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले. तर आभार शहर सुधारणा समिती सभापती स्वाती साने यांनी मानले. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, नगरसदस्या भारती फरांदे, आरती चोंधे, सुमन नेटके, आशा सूर्यवंशी, सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष रतनचंद मेहता, तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघ पदाधिकारी मारुतराव मोरे, सूर्यकांत मुथियान, जनार्दन कवडे, प्रभाकर कोळी, पंढरीनाथ कामथे, वसंत देशमुख, चंद्रकांत पारखी, बाबूराव फुले, नारायण काळे, पंडित खरात, माधव चौधरी, वृषाली मरळ, रमेश परब, सहदेव शिंदे, तुकाराम कुदळे, कमलिनी जगताप, सुनीता जयवंत, शिवदास महाजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहर विकासात ज्येष्ठ नागरिकांचे हवे योगदान
By admin | Published: October 02, 2015 12:51 AM