Corona virus : कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपणारं जोडपं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 06:39 PM2020-04-21T18:39:54+5:302020-04-21T20:40:43+5:30
स्वत:च्या जगण्याची भ्रांत असताना इतरांचा विचार...
वाकड : कोरोनाचे संकट ओढावल्यावर देश लॉकडाऊनमध्ये असताना घरी निवांत आराम करण्याऐवजी समाज मनाशी नाळ जोडली गेलेल्या या दांपत्याला स्वस्थ बसवेना, जागोजागी अडकून पडलेल्यांचे हाल बघवेना त्यामुळे करोना संकटाला सामोरे जात सामाजिक योगदान देण्याचा निश्चय त्यांनी केला. स्वत:ची झोळी फाटकी असताना त्यांनी अनेकांची पोटं भरत त्यांच्या मनात व हृदयात जागा मिळविली आहे. मोहन नगर, चिंचवड येथील ज्ञान दानात रमणारे व देशाची भावी पिढी घडविणारे शिक्षक दांपत्य महिन्याभरापासून समाजसेवेचे अविरत दान देत आहेत. या कोरोना लढ्यात असंख्य गरीब, गरजू व निराधार नागरिकांचा ते एकमेव पर्याय व भरभक्कम आधार बनले आहेत. दीपक जाधव व वैशाली जाधव असे या शिक्षक पती-पत्नीचे नाव...
सुरुवातीला घरातूनच भाजी-पोळी, वरण-भात तयार करून अनेकांना जेवणाचे डबे पुरवित प्रेमाचा घास भरविला. दुर्बल, गरजू, निराधार व दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य दुकानातील रेशन मिळण्यासाठी कंबर कसली. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांनी असंख्य गरजूंना ते धान्य घर पोहोच केले. ज्या लोकांना रेशनिंग मिळत नाही असे भाडेकरू, परप्रांतीय मजूर, गवंडी, वाहन चालक, धुणे-भांडी करणाऱ्या महिला अशा सर्वांना देव दर्शन युवा मंच व जैन विहार ग्रुपच्या मदतीने दोन वेळचे जेवण देण्याची नित्य जबाबदारी हे दांपत्य पार पाडत आहेत.
नि:स्वार्थीपणे समाजसेवा करणारे हे शिक्षक समाजसेवेबरोबरच वेळोवेळी कोरोना विषयी जनजागृती करून घ्यावयाच्या काळजीचे धडे नागरिकांना देत आहेत. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या खिचडी व जेवण वाटपाच्या ठिकाणी जाऊन स्वयंसेवक देखील बनत सामाजिक अंतराचे महत्व पटवून देत दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवून तोंडाला मास्क बांधण्याचा सूचना देताना दिसतात. याकामी त्यांचे मनोबल वाढविणारे, प्रोसाहन देणारे मोहन नगर पोलीस चौकीतील पोलिस हवालदार धर्मा झांजरे व घर सांभाळुन आई-वडीलांसोबत राबणा?्या दोनही मुलांचे त्यांनी आवर्जून आभार मानले.
.....................
स्वत:च्या जगण्याची भ्रांत असताना इतरांचा विचार
ज्ञानदानाच्या पवित्र कामाचे स्वप्न उरी बाळगणारे हे उच्चशिक्षित (पती- सायन्स डी.एड, पत्नी- एमए.बी.एड) पती-पत्नी कुठल्याही शासकीय अथवा खाजगी शाळेत कायम स्वरूपी शिक्षण सेवेत शिक्षक म्हणून रुजू नाहीत. दोघे मिळून एक खाजगी शिकवणी चालवून आपली गुजराण करतात. तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर संसार जेमतेम सुरू असताना, स्वत:च्या जगण्याची भ्रांत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची ही वृत्ती आदर्श मानावी अशीच आहे.