पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून निगडी भागातील रहिवाशी असलेल्या आणि पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबधित महिलेचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. दहा दिवसांत शहरात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या महिलेवर पुण्यातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिनांक 9 एप्रिलला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे दोघांचा मृत्यु झाला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, " पुण्यातील दक्षिणेकडील कमांड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. महिलेला 18 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्या महिलेचे वय 62 असून निगडी भागात संबंधित व्यक्ती वास्तव्यास होती. उपचारादरम्यान सोमवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार होता. हॉस्पिटलमध्ये दाखल केले असताना उपचारादरम्यान कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.