Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, पिंपरीत बालरोग उपचारासाठी 'टास्क फोर्स'ची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:30 PM2021-05-18T21:30:52+5:302021-05-18T21:31:00+5:30
कोरोना तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे....
पिंपरी : कोरोना तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने उपाययोजना सुरु केल्या आहेत. लहान मुलांचे कोविडवरील उपचार, अतिदक्षता विभाग, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, मार्गदर्शन, संचलन याबाबत बालरोग तज्ज्ञांची सहा सदस्यसीय टास्क फोर्स निर्माण केली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतची धोक्याची सूचना दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे.
...........................
अशी आहे टीम
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दिपाली अंबिके, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. शरद अगरखेडकर, आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे नियो-न्युटोलॉजिस्ट डॉ. राहुल कल्याणपुरकर, युनिक हॉस्पिटलचे नियो-न्युटोलॉजिस्ट डॉ. सुधीर माळवदे, स्टर्लिंग हॉस्पिटलचे बालरोग इटेन्सीव्हीस्ट डॉ. मनोज पाटील आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप शिंदे यांचा टास्क फोर्समध्ये समावेश आहे.
......................
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतची धोक्याची सूचना दिली आहे. या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविली आहे. या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेवून महापालिका हद्दीतील महापालिका, खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ञ यांना लहान मुलांचे कोविडवरील उपचार व लहान मुलांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, मार्गदर्शन, संचलन याबाबत करावयाचे कामकाजासाठी टीम तयार केली आहे.’’
.................
टास्क फोर्स काय करणार
१) महापालिका हद्दीतील महापालिका, खासगी रुग्णालयातील लहान मुलांसाठी उपचाराबाबतीत मार्गदर्शक तत्वे निर्माण करणार.
२) उपाययोजना आणि बाल रुग्ण उपचारांबाबत माहिती देणे आणि संचलनासाठी सूचना केल्या जाणार आहे.