पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याने महापालिकेने शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे साधन असणारी करसंकलन अद्याप बंदच आहेत. यामुळे महापालिकेला मिळणारा महसुलावर परिणाम झाला आहे.लॉकडाऊनचा परिणाम महापालिकेच्या अर्थकारणावर झाला आहे. राज्य सरकारकडून जीएसटीपोटी मिळणारा महसूल कमी झाला आहे. एप्रिल महिन्यात केवळ ५० कोटी रुपयेच महापालिकेला मिळाले आहेत. भविष्यातही पैसे कमी मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे; परंतु याकडे करसंकलन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटत आले आहेत. महापालिकेने १० मे रोजी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यातच १६ विभागीय करसंकलन कार्यालये बंदच आहेत. त्यामुळे ज्यांना कराचा भरणा करायचा आहे, त्यांना करभरणा करता येत नाही. चालू आर्थिक वर्षातील दोन महिने संपत आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेने कोरोनाची काळजी घेण्याच्या सूचना करत शहरातील विविध दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, विभागीय करसंकलन कार्यालये बंदच आहेत. केवळ ऑनलाइन करभरणा सुरू आहे.
सवलत योजनांना मुदतवाढ- महापालिकेने चालू आर्थिक वर्षात ३१ मे २०२० अखेर थकबाकीसह संपूर्ण मालमत्ता कर एकरकमी १०० टक्के भरल्यास भरणा दिनांकापर्यंत आकारलेल्या महापालिका कराच्या विलंब दंड रक्कमेत ९० टक्के सवलत जाहीर केली. आॅनलाइन कर भरण्याचे काम प्रत्यक्षात १० मेपासून सुरू झाले आहे.
..........................
- विभागीय कार्यालयेही बंदच आहेत. नागरिकांना केवळ २० दिवसच मिळत आहेत. त्यामुळे सवलत योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. याशिवाय १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत कर भरणाऱ्या सामान्य करात सवलत योजना आहे. तसेच ज्या माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी, फक्त महिलांच्या नावे असलेल्या, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या , कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावरील मालमत्तांना सवलत दिली जाते.