पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून आज दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. कोरोनामुळे रविवारी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३१ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे गेल्या महिनाभरात पहिला मृत्यू शहरात झाला आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. तर १ एप्रिलपासून १९ रूग्णांची वाढ झाली आहे. ११ मार्चला शहरात पहिले तीन रूग्ण सापडले होते. त्यानंतर मार्च अखेरपर्यत १२ रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर १ एप्रिलपासून दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक आणि त्यांच्या सहवासात आलेल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. पुण्यातील एनआयव्हीमध्ये शनिवारी २९ जणांचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ३१ असून त्यातील तीन रूग्ण पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून उर्वरित रूग्ण पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह रूग्णात दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक आणि त्यांच्या सहवासात आलेल्यांचा समावेश अधिक आहे.
महापालिका रूग्णालयात आज ६५ जणांना दाखल करण्यात आले असून पुण्यातील एनआयव्हीमध्ये त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तर आजपर्यंत रूग्णालयात एकुण ८० रूग्ण दाखल केले असून आज २७ रूग्णांना घरी सोडले आहे.
कोरोनाचा पहिला बळीराज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सुरूवातीला सर्वाधिक रूग्ण आढळले होते. मात्र, मार्च अखेरपर्यंत १२ ही रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर एक एप्रिलपासून रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या महिनाभरात एकही मृत्यू झाला नव्हता. रविवारी एका पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. संबंधित व्यक्ती ही ४५ वर्षांची असून तीला चार दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल केले होते. त्याचा आज मृत्यू झाला आहे.