CoronaVirus धोक्याची घंटा! पुणे, पिंपरीत शनिवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 01:25 AM2020-04-05T01:25:59+5:302020-04-05T06:55:41+5:30
पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104 असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.त्यात पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 74 होती.
पुणे: शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून शनिवारी पुण्यात आणखी 9 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 83 झाली आहे. तर पिंपरीमध्ये एकाच दिवशी नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.
पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104 असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.त्यात पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 74 होती. शुक्रवारी एकाच दिवशी 14 नवीन रुग्ण आढळून आले होते. तर शनिवारी 9 नवीन रुग्ण आढळून आले. त्यातील 7 पुणे महापालिका हद्दीतील असून प्रत्येकी 1 कॉन्टोन्मेट बोर्ड व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आहे. रात्री नऊपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुण्यात 83 पिंपरी चिंचवड मध्ये १५ रुग्ण झाले आहेत.
कोरोना बाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या दोन दिवसात त्यात 23 ने वाढ झाली आहे. त्यात काही खासगी रुग्णालयातील बाधितही होते. खासगी रुग्णालयातही शासनाच्या सूचाननुसार बाधितांवर उपचार केले जात आहेत.नायडू रूग्णालयात दाखल केल्या संशयीत रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले जात आहेत.त्यात काही रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर येत आहे.याच पध्दतीने रूग्ण पॉझिटीव्ह येत राहिले तर पुढील काही दिवसात हा आकडा शंभरावर जाण्याची शक्यता आहे.
रुग्णाची संख्या वाढली
दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमात मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्या दोघांना गुरुवारी आणि त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मधील एकाला शुक्रवारी अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 नागरिकांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मध्ये आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल असलेला एक आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेला पण पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असलेला अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एकजण अमेरिकेतून प्रवास करून आला आहे. आज एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.