Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले साडेतीन लाख; ४ हजार ८०० डोस गेले वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:46 PM2021-04-21T21:46:47+5:302021-04-21T21:47:02+5:30
डोस वाय जाण्याचे प्रमाण १२ टक्के....
पिंपरी: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम पिंपरी-चिंचवड शहरात थंडावली आहे. आजपर्यंत साडेतीन लाख लसीकरण झाले असून त्यात ४ हजार ८१० डोस वाया गेले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेची आणि खासगी अशा ८४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारकडून साठा मिळत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. महापालिकेने पंचवीस हजार लसीकरणाचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात साठा नसल्याने लसीकरण थांबले आहे.
पिंपरी -चिंचवड शहरासाठी कोवीशिल्डचे ३ लाख ११ हजार १०० तर कोव्हॅक्सीनचे ३४ हजार ८०० असे एकूण ३ लाख ४५ हजार ९०० लस उपलब्ध झाल्या होत्या. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या कोव्हिशील्डचे सर्वाधिक डोस मिळाले आहेत. त्यातुलनेत भारत बायोटेकने कमी डोस दिले आहेत.
........................................
डोस वाया जाण्याचे प्रमाण १२ टक्के
कोव्हिशील्डचे ३ लाख १० हजार ८९० (९९.९३ टक्के प्रमाण) तर कोव्हॅक्सिनचे ३२ हजार ६१० (८४.९२ टक्के प्रमाण) डोसेसचे लसीकरण केंद्रांवर वाटप केले होते. कोव्हिशील्डचे ३ हजार १०० आणि कोव्हॅक्सिनचे १ हजार ७१० असे ४ हजार ८१० डोस वाया गेले आहेत. एकूण लसीकरणाच्या तुलनेत डोस वाया जाण्याचे प्रमाण १२ टक्के आहे.
......................
चोवीस हजार डोस शिल्लक
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सध्या कोव्हिशील्डचे ९ हजार ०३२ आणि कोव्हॅक्सिनचे १५ हजार १४० असे २४ हजार १७२ लसीचे डोस शिल्लक आहेत. दोन दिवस पुरेल एवढाचा साठा उपलब्ध आहे.
......................
महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले, ‘‘लसीकरण करताना काही डोस वाया जात असतात. कोव्हिशील्डचे तीन हजार आणि कोव्हॅक्सिनचे एक हजार सातशे एकूण चार हजार आठशे डोस वाया गेले आहे.’’
...................
नुसत्या दुरूस्त्या
महापालिकेले पहिल्यांदा माध्यमांना माहिती दिली. त्यात कोवीशिल्डचे ३१ हजार १०० आणि कोव्हॅक्सीनचे १७ हजार १४० असे एकूण ४८ हजार १४० एवढया लसी वाया गेल्या आहेत, अशी माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने ही संख्या चार हजार आठशे आहे असे कळविले. त्यावरून माहितीबाबत महापालिकेचा घोळ असल्याचे दिसून येत आहे.