पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयामुळे गुन्हे झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:52 PM2019-08-08T12:52:26+5:302019-08-08T12:53:16+5:30
गेल्या वर्षीच्या व यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांचा तुलनात्मक आढावा घेतला असता गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
नारायण बडगुजर-
पिंपरी : उद्योगनगरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासून गुन्हेगारी कमी झाली आहे. गुन्हे दाखल होण्याचे आणि तपास निष्पन्न होण्याचे प्रमाण वाढले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, दरोडा, चोरी, वाहनचोरी आदी गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत एकूण ३३९७ तर यंदा ३६२० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झाले. पुरेसे मनुष्यबळ नसतानाही पोलीस सक्षमपणे काम करीत आहेत. महापालिका हद्दीतील निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, वाकड, दिघी, चिखली या नऊ तसेच महापालिका हद्दीबाहेरील हिंजवडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी या सहा ठाण्यांचा आयुक्तालयात समावेश आहे. गंभीर स्वरूपातील गुन्ह्यांवर नियंत्रण आले आहे. २०१८ मध्ये जानेवारी ते जून व २०१९ मध्येही जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या व यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांचा तुलनात्मक आढावा घेतला असता गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
वाहनचोरीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत ६४९ तर यंदा ६०२ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४७ गुन्हे कमी झाले आहेत.
फसवणुकीचे प्रमाण वाढले
विविध प्रकारे गंडा घालून फसवणूक केली जाते. आॅनलाइन व्यवहारातून, विश्वास संपादन करून, शेतजमीन, जागा, घर खरेदी-विक्री तसेच काही संकेतस्थळांवरून वाहने तसेच इतर साहित्य खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून, गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत १६२ तर यंदा पहिल्या सहा महिन्यांत २०३ गुन्हे दाखल झाले आहेत. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहनचालविण्याचे प्रकार वाढले आहेत. पहिल्या सहा महिन्यांत १६२ जणांचा मृत्यू झाला.
गंभीर गुन्हे...
बलात्काराचे गुन्हे गेल्या वर्षी ८० होते. त्यात घट होऊन यंदा ७३ गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी २२ असलेले दरोड्याचे गुन्हे यंदा १५ झाले. गेल्या वर्षी चोरीचे गुन्हे १२४५ होते त्यात ९९ ने घट होऊन यंदा ११४६ गुन्ह्यांची नोंद झाली. घरफोडीच्या गुन्हे ३३ वरून ३५ झाले आहेत.
१ जानेवारी ते ३० जून दरम्यानचे गुन्हे
२०१८ २०१९
खून ३४ ३१
खुनाचा प्रयत्न ६४ ५०
सदोष मनुष्यवध ५ १
हयगयीने मृत्यू १६२ १६२
दरोडा २२ १५
चोरी १२४५ ११४६
घरफोडी ३३ ३५
वाहनचोरी ६४९ ६०२
बलात्कार ८० ७३
फसवणूक १६२ २०३
एकूण गुन्हे ३३९७ ३६२०
प्रतिबंधात्मक १९८७ २५११
कारवाई
मोका २ २
एमपीडीए — २
तडीपार ४५ ७८