विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:38 PM2019-12-18T17:38:10+5:302019-12-18T17:38:44+5:30
लग्नाचे दागिने घेतले. ते परत मागितले असता मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ
पिंपरी : शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेचा छळ केला. तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. विशाल नगर, जगताप डेअरी येथे २०१३ ते सोमवार, दि.१६ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विवाहितेच्या 22 वर्षीय नातेवाईकाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासू अनुसया अंकुश सुरवसे, सासरे अंकुश एकनाथ सुरवसे (रा. त्रिकोळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), पती मारुती अंकुश सुरवसे, सुलोचना व शुकसेना (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांची बहीण आणि आरोपी मारुती सुरवसे यांच्या लग्नानंतर आरोपी सासू अनुसया हिने फिर्यादींच्या बहिणीकडून लग्नाचे दागिने घेतले. ते परत मागितले असता मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पती मारुती याला दारुचे व्यसन असल्याने त्यांच्यात वाद होत असत. त्यातून पती मारुती फिर्यादी यांच्या बहिणीला मारहाण करून छळ करत होता. तसेच 2017 मध्ये आरोपी सासरा अंकुश सुरवसे याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी शारीरिक व मानसिक छळ करून फिर्यादीच्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.